नाशिक : डोनाल्ड ट्रम्प यांनी दादागिरी, गुंडगिरी केली हा लोकशाहीला कलंक आहे. अमेरिकेत माझा रिपब्लिकन पक्ष हरल्याचं दुःख आहे. ट्रम्प यांनी माझं ऐकलं असतं तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, बायडन यांनी तिथल्या भारतीयांना नागरिकत्व द्यावं. भारताला सहकार्य करावं, त्यामुळं बायडन आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध चांगले होतील, असंही ते म्हणाले.


दिल्लीतील आंदोलन प्रसिद्धीसाठी सुरू
शेतकरी आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की, दिल्लीतील आंदोलन प्रसिद्धीसाठी सुरू आहे. शेतकरी आंदोलन असते तर कोर्टाने सांगितल्याने आंदोलन थांबायला हवे होते. हे निरर्थक आंदोलन आहे. सरकारची अडचण लक्षात घेऊन आंदोलन मागे घ्यावे. शरद पवार शेतकरी नेते आहेत, त्यांनीही राजकीय भूमिका घेतली आहे. शरद पवार यांनी मध्यस्थी करणे आवश्यक होते. शेतकरी कायद्याला पाठिंबा द्यायला हवा होता. शेतकरी ऐकाला तयार पण नेते नाहीत, असं ते म्हणाले.


US Inauguration : निरोपाच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'मी पुन्हा येईन...'


मंत्री आठवले म्हणाले की, अर्णब गोस्वामी प्रकरणी राहुल गांधी यांच्या आरोपाला काही अर्थ नाही. मोदींनी माहिती दिली असा आरोप करणं बालिशपणा आहे. अर्णबकडे ही माहिती असेल तर गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. अर्णब गोस्वामी संघर्ष करून पुढे आला ओरडून ओरडून बोलत पुढे आलाय, असं आठवले म्हणाले. आपल्या देशात तयार झालेलं कोरोना व्हॅक्सीन जगातील सर्वोत्कृष्ट व्हॅक्सीन आहे. पंतप्रधान आणि सर्व मंत्रिमंडळ लस घेणार असल्याचं आठवले म्हणाले.


आठवले म्हणाले की, तेलंगणामध्ये आर्थिक दुर्बलांना आरक्षण मिळाले. पण मी 2 वर्षांपासून मागणी करत होतो. त्यांनतर केंद्र सरकारने सवर्णांना आरक्षण दिले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र आले पाहिजे. आम्हाला केंद्र स्तरावर केवळ मराठा नाही तर क्षत्रिय लोकांचा ही विचार करावा लागणार आहे, असंही आठवले म्हणाले