मुंबई : लॉकडाऊनमुळे आधीच शेतकरी तोट्यात असताना अचानक खतांच्या भरमसाठ किमती वाढल्याने संताप व्यक्त केला जात होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी यासंदर्भात रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना पत्र लिहलं होतं. तसेच राजू शेट्टी यांनी देखील याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आज केंद्रीय मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी शेतकऱ्यांना जुन्याच दरांनी खतं मिळणार असल्याचं सांगितलं आहे.
गौडा यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे की, आंतरराष्ट्रीय किंमतीमध्ये वाढ झाली आहे तरीही देखील शेतकऱ्यांना जुन्याच दरांनी खतं मिळतील, असं त्यांनी म्हटलं आहे. DAP खतांवर सबसीडी 140% वाढवली आहे. शेतकऱ्यांना DAP वर 500 रुपये प्रत्येक गोणीवरुन आता 1200 रुपये प्रती गोणी सबसिडी मिळेल. शेतकऱ्यांना DAPची एक बैग 2400 रुपयाऐवजी 1200 रुपयांना मिळेल, असं गौडा यांनी सांगितलं आहे.
केंद्रीय खत व रसायन मंत्री सदानंद गौडा यांना शरद पवार यांनी पत्र लिहिलं होतं. त्यानंतर पवार यांना गौडा यांनी फोन करून लवकरच रासायनिक खतांच्या दरवाढीचा पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले होते. रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावे, केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना या प्रकरणी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे आणि किमतीतील वाढ लवकरात लवकर मागे घ्यावी अशी विनंती केली होती. या पत्राची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी आज शरद पवारांशी फोनवर चर्चा केली. पत्रातील सूचनांचा अभ्यास करून पुढील दोन दिवसांत दरवाढ मागे घेण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे त्यांनी पवार यांना आश्वासित केले होते.
शरद पवारांनी काय लिहिलं होतं पत्रात
कोरोना महामारीमुळे सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम समाजातील अनेक घटकांवर झाला आहे. लॉकडाऊनमुळे शेतीमालाला उठाव नसल्याने शेतकरीही अडचणीत आहे. अशाच परिस्थितीत केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हे वाढवलेले खतांचे दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी शरद पवार यांनी रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे. इंधनाच्या वाढीव दरासोबत आता नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. हा निर्णय अत्यंत धक्कादायक असून याचे त्वरित पुनरावलोकन करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उद्याचे आंदोलन स्थगित
दरम्यान खतांच्या दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उद्या आंदोलन पुकारले होते. ते आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांची केलेली दरवाढ मागे घेतली, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा मोठा विजय आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.