मुंबई : लॉकडाऊनमुळे आधीच शेतकरी तोट्यात असताना अचानक खतांच्या भरमसाठ किमती वाढल्याने तो दुहेरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना पत्र लिहलं आहे. या प्रकरणात वैयक्तिकरित्या लक्ष घालण्याची आणि किंमतीतील वाढ लवकर मागे घेण्याची विनंती, पवार यांनी मंत्र्यांना केली आहे. 


कोरोना महामारीमुळे सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम समाजातील अनेक घटकांवर झाला आहे. लॉकडाऊनमुळे शेतीमालाला उठाव नसल्याने शेतकरीही अडचणीत आहे. अशाच परिस्थितीत केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हे वाढवलेले खतांचे दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी शरद पवार यांनी रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे. इंधनाच्या वाढीव दरासोबत आता नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. हा निर्णय अत्यंत धक्कादायक असून याचे त्वरित पुनरावलोकन करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.






खतांचे वाढलेले नवीन दर काय आहेत? 
इफको 10:26:26 चा जुना दर हा 1175 रुपये इतका होता, तो आता 1775 रुपये इतका झाला आहे. इफको 10:32:16 चा जुना दर हा 1190 इतका होता आता तो 1800 रुपये इतका झाला आहे. इफको 20:20:00 चा जुना दर हा 975 रुपये इतका होता तो आता वाढून 1350 रुपये इतका झाला आहे. डीएपी खताचा जुना दर हा 1875 रुपये इतका होता, तो आता 1900 रुपये इतका झाला आहे. आयपीएल डीएपी खताची जुनी किंमत 1200 रुपये होती ती आता 1900 रुपये इतकी झाली आहे. आयपीएल 20:20:00 ची जुनी किंमत ही 975 रुपये इतकी होती, ती आता 1400 रुपये इतकी झाली आहे. पोटॅशच्या एका पोत्याची किंमत आधी 850 रुपये होती, ती आता 1000 रुपये करण्यात आली आहे.




किंमती वाढण्याचं कारण काय?
खताला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्या आहेत, ज्याचा परिणाम भारतातील खताच्या किंमतीवर झाला, असं बोललं जात आहे.