सांगली : हातकणंगले मतदारसंघाबाहेर निवडणूक लढवून दाखवा, म्हणजे तुमची ताकद समजेल, असं खुलं आव्हान राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिलं आहे. सदाभाऊ खोत सांगलीत बोलत होते.


राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वीच सदाभाऊ खोत यांची 7 ऑगस्ट रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केली होती. सदाभाऊंविरोधातील तक्रारींबाबत स्वाभिमानीने पक्षांतर्गत नेमलेल्या चार सदस्यीय समितीने, पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हकालपट्टीची घोषणा केली.

राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा नव्हे तर क्लेश यात्रा होती, असं म्हणत सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींवर हल्लाबोल केला.

राजू शेट्टी म्हणाले की, "राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सदाभाऊंना मंत्रिमंडळातून काढण्याची विनंती केली आहे. म्हणजे यांना खऱ्या अर्थाने सदाभाऊक्लेश झालेला आहे. मी मंत्रिपदावर आहे हीच मोठी असूया त्यांच्यात निर्माण झाली आहे. परंतु मला गावातील शेतकऱ्यांनी उभं केलं आहे, त्यांनी मला घडवलं आहे. त्यामुळे माझ्या आयुष्याचा निर्णय हा शेतकरीच घेईल, इतरांना तो अधिकार नाही. तर सत्तेच्या बाबतीतला निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि त्यांचा निर्णय मला मान्य असेल. खासदार राजू शेट्टी माझे मालक नाहीत किंवा मी त्यांचा गुलाम नाही."

"माढा लोकसभा मतदारसंघात जाऊन मी पाच लाख मतं घेतली, ह्यांनी हातकणंगले मतदारसंघाबाहेर जाऊन उभं राहून तिथे मतं घेऊन दाखवावीत. मग कळेल समाजात कुणाची किती पत आहे. ह्यांनी दुसरा उमेदवार माढा लोकसभा मतदारसंघात उभा करुन दाखवावा आणि एक लाख मतं घ्यावीत, मग समजेल तिथे कोणाची किती ताकद आहे."

संघटनेचं नाव लवकरच जाहीर करणार
दरम्यान, माझ्या नव्या संघटनेचं नाव आणि झेंडा लवकरच स्पष्ट करु, असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. शिवाय आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढत राहण्याचा निर्धार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला होता.

स्वाभिमानीला आणखी एक मंत्रिपद?
सदाभाऊ खोत यांचं काम चांगलं असून त्यांना मुख्यमंत्री कोट्यातून मंत्री झाले आहेत. सदाभाऊ खोत यांचं मंत्रिपद काढून घेण्यापेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अजून एक मंत्री पद देण्याचा विचार असल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापुरात म्हणाले.

संबंधित बातम्या

शेतकरी नेत्यांची जोडी फुटली, सदाभाऊंची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी


'स्वाभिमानी'तून हकालपट्टीनंतर सदाभाऊ खोतांची नवी संघटना