मुंबई : केवळ महिला मुख्यमंत्री झाली तर प्रश्न सुटेल असं नाही, खऱ्या अर्थाने महिलांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेऊन ते सोडवणारे अजितदादा हे मुख्यमंत्री व्हायला हवेत असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी म्हटलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे बोलण्यासारखं काही नाही, त्यामुळे ते फक्त महायुतीवर टीका करतात असा टोलाही त्यांनी लगावला. महिला मुख्यमंत्री झाली तर आपल्याला आवडेल अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली.


काँग्रेसने महिलांना संधी का दिली नाही?


केवळ महिला मुख्यमंत्री होऊन महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्याच्या समस्या काय आहेत हे जाणून घेऊन त्या सोडवणारे, सक्षमपणे प्रशासन सांभाळणारे अजितदादा हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. इतर पक्ष महिलांना संधी देत नाही असं वर्षा गायकवाड यांना वाटत असेल तर मागील काळात काँग्रेस पक्षाची सत्ता होती, त्यावेळी त्यांनी महिला मुख्यमंत्री द्यायला पाहिजे होती . सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री होऊ शकतात या वर्षा गायकवाडांच्या वक्तव्याबाबत त्यांना शुभेच्छा. 


आम्ही महिला आयोगाचे अध्यक्षपद मिळाल्यापासून महिलांची संघटना चांगल्या प्रकारे सांभाळत आहे.वेगवेगळी कामं करत आहोत. अशा पद्धतीने वक्तव्य करून महायुतीवर केवळ टीका करून प्रसिद्धी मिळवणे हा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा उद्देश आहे असा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला. 


इतरांवर टीका करणे म्हणजे बालिशपणा


राज्यात महिला मुख्यमंत्री झाली तर मलाही आवडेल, महिलांना 50 टक्के संधी मिळाली पाहिजे. महिलांचे नेतृत्व पुढे आले पाहिजे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. मात्र इतरांवर टीका करून आपण किती चांगले आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न म्हणजे बालिशपणा असल्याचा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला. 


ही बातमी वाचा: