मुंबई : आगामी विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा  महाविकास आघाडीमध्ये अजूनही सुटलेला नाही. मात्र मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीमध्ये मोठी रस्सीखेच सुरू होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मागणीनंतर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री या महिला झाल्या पाहिजेत असं वक्तव्य खासदार वर्षा गायकवाड यांनी केलंय. एवढेच नाही तर त्यांनी काही महिलांचीही नाव घेतलीत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्याच्या आधीच मुख्यमंत्रीपदावरून मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होताना पाहायला मिळतेय.


निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे नेतृत्व करतील अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांची वारंवार पाहायला मिळाली. एवढेच नाही तर आपल्या मनातील खदखद स्वतः उद्धव ठाकरे यांनीही व्यक्त केली होती. यासाठी उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौराही झाला असल्याची चर्चा होती. नंतर काही दिवस ही चर्चा थांबली होती. मात्र काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू झालीय.


रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं


दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री होत असेल तर पुरोगामी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री अद्यापपर्यंत का नाही असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे महिला मुख्यमंत्री देण्याचा विचार केला पाहिजे अशी माझी भूमिका असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलय. मात्र त्या एवढ्यावरच थांबल्या नाही तर शिवसेना ठाकरे गटातून रश्मी ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटातून सुप्रिया सुळे आणि काँग्रेस मधून चार ते पाच महिला नेत्या आघाडीवर असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. काँग्रेसमध्येही धडाडीच्या नेत्या म्हणून यशोमती ठाकुर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांच्याकडे सध्या तरी पाहिलं जातय.


देश स्वतंत्र झाल्यापासून भारतात आतापर्यंत फक्त 16 महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. त्यापैकी महिला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात एकाही महिलेला स्थान मिळालेले नाही. उलट महिला धोरण स्वीकारणार महाराष्ट्र हे पहिल राज्य आहे. 


काय आहे महिला मुख्यमंत्र्यांचा इतिहास?



  • देशात आजवर 16 वेळा महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत.

  • स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्या महिला मुख्यमंत्री स्थानापन्न व्हायला पहिली 16 वर्षं जावी लागली.

  • सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेश आणि देशातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.

  • ऑक्टोबर 1963 पासून मार्च 1967 पर्यंत त्या देशातल्या सगळ्यांत मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. 

  • सुचेता कृपलानींनंतर तब्बल 9 वर्षांनी, 1972 मध्ये नंदिनी सत्पथी ओरिसाच्या मुख्यमंत्री झाल्या.

  • ज्या 16 महिला आजवर मुख्यमंत्री झाल्या त्यापैकी बहुतेक जणींच्या डोक्यावर पूर्वजांचा, वडिलांचा किंवा नवऱ्याचा आशीर्वाद होता हे नाकारून चालणार नाही.

  • शशिकला काकोडकर, अन्वरा तैमूर, जानकी रामचंद्रन, जयललिता, राबडीदेवी, शीला दीक्षित, वसुंधरा राजे, मेहबुबा मुफ्ती यांची नावं या पंक्तीत घेता येतील.

  • याला अपवाद म्हणुन उमा भारती, सुषमा स्वराज आणि ममता बॅनर्जी यांचा होता. त्यातही चौकट मोडून ठसा उमटवण्याचा प्रयत्न जयललिता, ममता आणि मायावती यांनी केला.

  • मात्र महिला धोरण स्वीकारणार आणि पुरोगामी महाराष्ट्रात एकदाही महिला मुख्यमंत्री म्हणून स्थान मिळालं नाही.



महाविकास आघाडीचं नाही तर महायुतीमध्ये सुद्धा भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक महिला या नेतृत्व करु शकतील. मात्र महिलांना मुख्यमंत्रीपदाचे स्थान देण्यामध्ये कुठेतरी राज्याच्या राजकारणामध्ये उदासीनता पाहायला मिळतेय. हे जरी खरं असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या मागणीनंतर आता वर्षा गायकवाड यांच्या मागणीने महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मोठी रस्सीखेच सुरू होताना पाहायला मिळतेय.


ही बातमी वाचा: