धुळे: मुले पळवणारी टोळी समजून पाच जणांची हत्या केल्याप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे.  साक्री तालुक्यातील राईनपाडा या आदिवासी पाड्यावर 1 जुलैला, जमावाने मुले पळवणारी टोळी समजून पाच जणांची हत्या केली.

राईनपाडा हे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गाव आहे. या गावाच्या आठवडे बाजारात काहीजण फिरत होते. हे फिरणारे लोक मुले पळवणारी टोळी आहे, असा संशय घेऊन 1 जुलैला दुपारी त्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात डांबून मारहाण करण्यात आली.

मुलं पळवण्याच्या संशयातून पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राईनपाडा गावात नागरिकांनी 5 जणांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना ग्रामपंचायतच्या खोलीत डांबण्यात आलं. तिथंही त्यांना बेदम मारहाण झाली. यावेळी संपूर्ण खोलीत रक्ताचा सडा पडलेला दिसला. मारहाण झालेले एका कोपऱ्यात विव्हळत असतानाही त्यांच्यावर उपचार करायचे सोडून, जमावाकडून त्यांना मारहाण सुरुच राहिली. आणि त्यातचं या पाचही जणांचा जीव गेला.

मृतांपैकी भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर मालवे, अगनू इंगोले हे चौघेजण सोलापुरातील मंगळवेढा येथील राहणारे होते, तर राजू भोसले कर्नाटकमधील राहणारे होते.

हत्या झालेल्यांची नावे

1 भारत शंकर भोसले (रा. खावे, मंगळवेढा)

2 दादाराव शंकर भोसले (रा. खावे, मंगळवेढा)

3 भारत शंकर मालवे  (रा. खावे, मंगळवेढा)

4 अगनू इंगोले -  (रा. मानेवाडी, मंगळवेढा)

5 राजू भोसले रा. गोंदवून ( कर्नाटक )

या मारहाणप्रकरणी रविवारी 15 जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

याप्रकाराने राईनपाडा गावात तणावाचे वातावरण असून, घटनेनंतर रविवारी पोलिस अधीक्षकांसह मोठा पोलिस फौजफाटा गावात दाखल झाला.

गृहराज्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

सोशल मीडियावरील अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका, असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. तसेच, मारहाण करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही गृहराज्यमंत्री केसरकरांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत, राईनपाडाला जाऊन घटनास्थळाला ते भेट देतील.

आयजींची भेट

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाशिक परीक्षेत्राच्या आयजींनी घटनास्थळाची पाहणी केली. संतप्त जमावाने ज्या ग्रामपंचायत कार्यालयात हे हत्याकांड केलं, त्या ग्रामपंचायत कार्यालयाचे दरवाजे खिडक्या देखील तोडण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायत कार्यालयात रक्ताचा सडा पडला होता.

संबंधित बातम्या

मुले पळवणारी टोळी समजून मारहाण, 5 जणांचा जागीच मृत्यू