Motor Vehicles Act: अनेकदा वाहतूक पोलिसांकडून आपलं वाहन अडवलं जाऊ नये म्हणून आपल्या वाहनांवर लोक पोलीस किंवा मग पोलीस बोध चिन्ह लावतात. जेणेकरून वाहतूक पोलिसांनी आपली अडवणूक करू नये. पण आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर "पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस" लिहिलेले आढळून आले तर त्या वाहनांवर आता कारवाई केली जाणार आहे. मोटार वाहन अधिनियम, 1988 (Motor Vehicles Act) व तद्गुषंगीक नियमांतील तरतूदीनुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पत्रकार विकी जाधव यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर "पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस" लिहलेल्या वाहनांवर कारवाई करावी अशी तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालयाला केली होती. त्यानंतर आता हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश
पत्रकार विकी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कार्यरत वायुवेग पथकांमधील मोटार वाहन निरीक्षक त्याचबरोबर सहा मोटार वाहन निरीक्षक यांनी तपासणी दरम्यान खासगी वाहनांवर "पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस" लिहिलेले आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. तसेच वाहनांवर 'महाराष्ट्र शासन' अशी पाटी किंवा बोध चिन्हांचा वापर केलेला असल्यास, दोषी वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, 1988 (Motor Vehicles Act) नियमांतील तरतूदीनुसार काटेकोरपणे कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आदेश
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स.अ. गिरी यांनी या आदेशानुसार राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर "पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस" लिहिलेले किंवा 'महाराष्ट्र शासन' अशी पाटी लावण्यात आल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल खटला विभागात न चुकता सादर करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत.
या आदेशामुळे आता राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर "पोलीस" लिहण्यास मनाई करण्यात आली आहे आणि त्याची अंमलबजावणी कठोरपणे केली जाणार आहे.
पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये
पुण्यातील पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणानंतर मुंबई पोलिस (Mumbai Police) अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. मंत्रालय परिसरातील अधिकाऱ्यांच्या गाडीवरील दिवे आता काढायला सुरुवात झाली आहे. तसंच ते दिवे काढून त्या अधिकाऱ्याला नोटीस पाठवण्यात येत आहे. दिवा लावण्याची परवानगी नसेल आणि तरीही जर गाडीवरती दिवा लावला असेल तर मात्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
मुंबई पोलीसांची ही महत्त्वाची आणि मोठी कारवाई मानली जात आहे. दिवा लावण्याची परवानगी नसेल आणि तरीही जर गाडीवरती दिवा लावला असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या आणि बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरील दिव्यांची पाहणी करण्यासाठी मुंबई पोलिसांच विशेष पथक आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून ते सचिवांपर्यंत सर्वच गाड्यांवरचे दिवे काढायला सुरुवात झाली आहे.