कोल्हापूर : मी कुणाचा गुलाम म्हणून मागे फिरत नाही. रासपचं अंतिम ध्येय दिल्ली आहे. त्यामुळे कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान होईन असा दावा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केला आहे.ते कोल्हापुरात बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीचा रस्ता डांबरीकरणाचा आहे तर भाजपचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. मी मात्र आनंदाने पुढे चाललो आहे. माझाही सूर्य कधी तरी उगवेल, असं जानकरांनी म्हटलं आहे. 


दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी चार तारखेला राष्ट्रीय समाज पक्ष राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली आहे. सोलापुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर विचारला असता ते माझ्या पक्षात नाहीत त्यांच्यावर बोलून त्यांना का मोठं करू असं म्हणत त्यांनी यावर बोलणं टाळलं.


...म्हणून मी भाजपने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झालो नाही-जानकर


भाजपने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात राज्यभर 1000 ठिकाणी आंदोलन केले. अनेक ठिकाणी भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, गुन्हे देखील दाखल केले.  मात्र या सगळ्या आंदोलनामध्ये महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष कुठेही सहभागी झाला नाही. याबाबत विचारले असता भाजप हे त्यांच्या पक्षाचे आंदोलन करत होते. मी माझ्या पक्षाकडून आंदोलन करणार आहे. त्यामुळे मी भाजपने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झालो नाही, असं स्पष्टीकरण महादेव जानकर यांनी दिलं आहे...


जानकरांना भाजपने साईडलाइन केल्याची चर्चा


रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे भाजपच्या प्रमुख सहयोगी पक्षातील एक होय. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून भाजपने धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या मागे आपली रसद लावली आहे. पडळकर हे सुरुवातीला महादेव  जानकर यांच्यासोबत काम करत होते. आता ते भाजप सोबत आहेत,   शिवाय भाजप पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यामध्ये पडळकर जानकारांपेक्षा सरस ठरत आहेत. त्यामुळे जानकरांना साईडलाइन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.