बुलढाणा : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ते "कुणी खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करत असेल तर तुम्ही त्यांच्यावर रॉबरीचे गुन्हे दाखल करा. तुम्हाला कुणी त्रास दिला तर मी तुम्हाला अस्त्र-शस्त्राची सगळी ताकद पुरवतो," असं वक्तव्य करताना दिसत आहेत.


या वक्तव्यांना दहा दिवसांपूर्वी खामगावच्या अंबिकापूर गावात झालेल्या हिंसक घटनेची किनार आहे. खामगावच्या अंबिकापूरमध्ये वाघ आणि हिवराळे कुटुंबात जुने वाद होते. त्यातून काही दिवसांपूर्वी त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही कुटुंबातील सदस्य जखमी झाले होते. यानंतर संजय गायकवाड हे वाघ कुटुंबाच्या सांत्वनासाठी गावात गेले असताना त्यांनी तिथं काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे.


संजय गायकवाड यांची वक्तव्ये दोन समाजातील स्वास्थ्य बिघडवणारी असल्याचे रिपाइं (खरात गट)नं म्हटलं आहे. त्यामुळे संजय गायकवाड यांची वक्तव्यं तपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रिपाइं खरात गटाने केली आहे.


संजय गायकवाड काय म्हणाले?


"एका मागच्या प्रकरणामध्ये आत्महत्या झाली, त्याची चिठ्ठी देखील सापडली, तरी गुन्हा दाखल झाला नाही. छोट्या मोठ्या गोष्टीतून दादागिरी करुन दोघांनी दहशत निर्माण केली. दुर्दैवाने सांगावं वाटतं की सर्व सामाजाने त्याला साथ दिली. बाबासाहेब आंबेडकर यांना असा समाज कधीच अपेक्षित नव्हता. बाबासाहेबांनी लोकांचं रक्षण करायला शिकवलं. परंतु आमच्या समाजाचे लोक अशाप्रकारच्या गालबोटाचं समर्थन करुन एका परिवारावर हल्ला करतात हे निश्चित दुर्दैवी बाब आहे. त्याचप्रमाणे मी या गावातील मुस्लीम समाजाचं मनापासून अभिनंदन करेन की या लोकांनी जातपात न पाहता इथल्या महिलांना मदत केली. भेदरलेल्या, घाबरलेल्या कुटुंबाला सहारा देण्याचा प्रयत्न केला. समाजातल्या, गावातल्या लोकांना मी सांगेन की जर कोणी अॅट्रॉसिटीचा खोटा रिपोर्ट देऊन ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही देखील डायरेक्ट रॉबरीची कम्प्लेंट त्याच्या क्रॉसमध्ये द्यायची. गळ्याला चाकू लावला, चैन हिसकली, पैसे खिशातले हिसकले, अशाप्रकारने तुम्ही तक्रार दिली तर झक मारुन अॅट्रॉसिटीची कम्प्लेंट मागे घेतो, हे सगळं पहिलं समजून घ्या. कोणी अॅट्रॉसिटीची कम्प्लेंट दाखल केली तर रॉबरी टाकायची म्हणजे टाकायची. कोणता ठाणेदार घेत नाही हे मग आम्ही पाहू."