मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला गेला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सब कमिटीची बैठक झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी अवकाळी पावसातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून 10 हजार कोटींची मदत करणार असल्याचे ते म्हणाले. प्रशासनाकडून पंचनामा न होऊ शकल्यास शेतकऱ्यांनी नुकसानीचा फोटो काढून जरी पाठवला तरी ग्राह्य धतले जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने केले जातील. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. तात्काळ मदत म्हणून 10 हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अनिल बोंडे, विजय शिवतारे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी जरी हा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाचा शासन निर्णय कधी निघणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय यावेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. प्रत्यक्ष स्थितीचे अवलोकन करून मदतीचा तपशील लवकरच ठरवावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले. याव्यतिरिक्त विमा कंपन्यांकडून सुद्धा मदत देण्यासंबंधी सरकार त्यांच्या संपर्कात आहे. पंचनाम्यांच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. मोबाईलने घेतलेल्या छायाचित्रांना परवानगी देण्यात आली आहे. लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करीत आहोत, परंतु त्याची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या निधीतून मदत करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्लॉनसह चार वादळांचा फटका बसला, या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अधिक होती.  त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावीप्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी. यासाठी दुष्काळाच्या काळात उभारलीतशी यंत्रणा उभारावीव्हॉटसअ‍ॅप क्रमांक सुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत. शासनाचे या स्थितीवर संपूर्णपणे लक्ष असूनपालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे. ज्वारीमकाधानतूरकापूससोयाबीन आणि फळपिके यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तात्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल दिले होते. 

यंदाच्या हंगामात पेरणीच्या सुरुवातीच्या काळात पावसाचा खंड राहिल्याने मूग, उडीद आदी पिके उद्ध्वस्त झाली. मग पुन्हा पावसाने धडाका सुरु केला. कसंबसं मेहनत करुन आलेलं पिकांचं संततधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आता कापूस वेचणीचा आणि सोयाबीन सोंगणी अन् मळणीचा हंगाम असताना 18 ऑक्टोबरपासून सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे हे सोयाबीन जागेवरच भीजले.  ज्वारीच्या कणसामधील दाण्यांचे बीजांकुरण होत आहे. कणसे काळी पडली आहेत. कापसाची बोंडे सडायला लागली आहेत, तर फुटलेल्या बोंडामधील कापूस ओला झाल्याने प्रतवारी खराब झाली आहे. कापूस सडायला लागला आहे. यामधील सरकीलाच कोंब फुटायला लागले असल्याचे विदारक चित्र शेतशिवारात आहे.