संजय राऊत म्हणाले की, आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापनेस विलंब झाला आहे. अनेक भाजपशासित राज्यांमध्येदेखील असे घडले आहे. तसेच महाराष्ट्रातदेखील सत्तास्थापनेस उशीर झाला आहे. त्यामुळे अशा वेळी राष्ट्रपती राजवटीची धमकी देणं भाजपला शोभत नाही. भाजपची ही धमकी लोकशाहीविरोधी आहे.
संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रपती राजवटीची भाषा करणे, हा निवडणुकीतील जनादेशाचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने महायुतीला मतदान करुन उमेदवार निवडून दिले आहेत. परंतु या जनादेशाचा आदर करुन सत्तास्थापन करण्याऐवजी राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जात आहे. राष्ट्रपतींच्या पदाची प्रतिष्ठा घालवू नका, असा सल्लादेखील राऊत यांनी भाजपला दिला आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आतापर्यंत आठ दिवस उलटून गेले आहेत. परंतु अद्याप राज्यात कोणत्याही पक्षाने सत्तास्थापन केलेली नाही. राज्यात भारतीय जनता पक्षाचे 105 (11 अपक्षांच्या पाठिंब्यानंतर 116)आणि शिवसेनेचे 56 (7 अपक्षांच्या पाठिंब्यानंतर 63) आमदार निवडून आले आहेत. राज्यातल्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे, परंतु शिवसेना भाजपमधील मंत्रीपदांच्या वाटपावरुन कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळे अद्याप राज्यात सत्तास्थापन झालेली नाही.
शिवसेनेने भाजपकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. भाजपला मुख्यमंत्रीपद सोडवत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चर्चादेखील होत नाहीये. याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभर विविध चर्चांना उधाण आले आहे.
पाहा काय म्हणाले संजय राऊत?
राष्ट्रपती राजवटीची धमकी?
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शिवसेना खासदार संजय राऊतांचा पुनरुच्चार | मुंबई | ABP Majha