सांगली : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आर. आर. पाटील (RR Patil) यांचे त्याच्या आई भागिरथी पाटील यांच्यावरील प्रेम आर आर पाटील हयात असताना अनेकवेळा पाहायला मिळाले होते.  आता आर आर पाटील यांचे बंधू राजाराम पाटील यांचे देखील आईवरील प्रेम दिसून आले आहे. आर आर पाटील यांचे बंधू आणि करवीरचे पोलिस उपअधीक्षक राजाराम पाटील यांच्या पोलीस दलातील सेवेचा काल शेवटचा दिवस होता. पोलीस दलातील आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर काल राजाराम पाटील सेवानिवृत्त झाले. 


पोलीस दलातील आपला शेवटच्या दिवशी आई  भागिरथी यांना सॅल्यूट करुन  राजाराम पाटील  नोकरीवर जाण्यासाठी ते कामासाठी दाखल झाले. ज्या आईने अनेक संकटाला सामोरे जात शिकवलं व घडवलं तिला सॅल्यूट करुन काही प्रमाणात आईच्या उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न राजाराम पाटील यांच्या या कृतीतून दिसून आला. नोकरीच्या शेवटच्या दिवशी आईला सॅल्यूट करुन तिचा सन्मान केल्याचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  


रोहित पाटील यांची देखील आपल्या चुलत्यांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट
आर आर आबांचे पुत्र रोहित पाटील यांनी त्यांचे काका सेवानिवृत्त झाल्यानंतर फेसबूक पोस्ट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की,  आज माझे मोठे चुलते राजाराम (तात्या) पाटील सेवानिवृत्त होत आहेत. व्यक्तिगत माझ्या आयुष्याला बहुतांश आकार आणि शिकवण ज्यांनी दिली त्या तात्यांची आज सेवानिवृत्ती.  कुटुंब म्हणून आम्हा सर्वांसाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे आणि त्याची पार्श्वभूमी सुध्दा काहीशी तशीच आहे. सुरुवातीच्या काळात भरती पूर्व परीक्षेत पास झाल्यानंतर ज्यावळेस ही बातमी त्यांनी आबांच्या कानावर घातली होती त्यावेळेस आबांच्या डोळ्यातून अश्रू आलेला किस्सा आज सुध्दा सांगताना त्यांचे डोळे भरून येताना मी पाहिलं आहे.


रोहित पाटील यांनी म्हटलं आहे की, घरचा पहिलाच सरकारी पगार असलेली व्यक्ती म्हणून आबांना सुध्दा नेहमी त्यांचा अभिमान होता. आबा गृहमंत्री असताना कधीही गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून न मिरवता त्यांनी काम केले आणि नेहमीच त्यांनी ते अंतर ठेऊन काम केले. सेवेतला बहुतांश काळ हा साईड पोस्टिंग मध्येच काम त्यांनी केले आणि कधीही आबांकडे त्यांनी कोणती मागणी केली नाही हे मात्र अगदी ठळकपणे सांगायला मला आवडेल. कधी कधी त्यांच्या सेवा काळाबद्दल विचार केला तर गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून काम करताना त्याचे काही तोटे सुध्दा असू शकतात हे लक्षात येतं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांनी तयार केलेला लोकांचा संग्रह आणि तेथील लोकांना त्यांच्याबद्दल असणारी आपुलकी हीच त्यांच्या कामाची पोच पावती आहे असं मला नेहमी वाटतं. आज सेवेत असताना शेवटचे ऑफिसकडे जाताना त्यांना खूप कष्ट करून शिकवलेल्या माझ्या आज्जीला सॅल्यूट करून ते रवाना झाले. आर आर आबांचा मुलगा म्हणून जेवढा अभिमान आहे तितकाच आभिमान डी.वाय.एस. पी आर आर तात्यांचा पुतण्या म्हणून आहे आणि राहील एवढच आजच्या दिवशी मला त्यांना सांगायचंय, असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.