अहमदनगर  : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar)  यांनी अण्णा हजारेंवर (Anna Hazare) टीका केली.  या टीकेला अण्णा हजारेंनी प्रत्युत्तर दिले.  त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून अण्णा हजारेंना प्रत्युत्तर देताना खोचक शब्दांत टीका केली आहे.   2014 पूर्वी छोटं टूक वाजलं तरी अण्णा हजारे आंदोलन करायचे मात्र  गेल्या दहा वर्षात त्यांनी एकही शब्द काढला नाही. एकीकडे स्वतःला नवीन काळचा गांधी समजतात आणि दुसरीकडे भाजपच्या कार्यकाळात सोयीचं आंदोलन करतात त्यामुळे त्यांनी एक प्रकारे मुखोटाच घातलाय असच आपल्याला म्हणावं लागेल असं म्हणत रोहित पवार यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले,  2014 पूर्वी अण्णा हजारे यांना काँग्रेस सरकारच्या काळात आपण अनेकदा आंदोलन करताना पाहिलं, छोटं टूक वाजलं तरी अण्णा हजारे आंदोलन करायचे.  मात्र भाजप सरकारच्या काळात इलेक्ट्रॉल बॉण्डचा घोटाळा झाला, ॲम्बुलन्स घोटाळा झाला, शेतकरी हवालदिल आहेत.  बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. मणिपूरमध्ये आणि महाराष्ट्रात महिलांवरती अत्याचार सुरू आहेत अशावेळी लोकांची अपेक्षा होती की अण्णा हजारे यांनी आंदोलन करावं.पण  गेल्या दहा वर्षात त्यांचा एकही शब्द आपण ऐकला नाही एका बाजूला ते स्वतःला नवीन काळचा गांधी समजतात आणि दुसरीकडे भाजपच्या कार्यकाळात सोयीचं आंदोलन करतात.  त्यामुळे त्यांनी एक प्रकारे मुखोटाच घातलाय असच आपल्याला म्हणावं लागेल.

स्ट्राँग रूमच्या सीसीटीव्ही कॅमेराबाबत रोहित पवार म्हणाले.... 

 महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी एक व्हिडिओ ट्वीट करत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमच्या सीसीटीव्ही कॅमेराबाबत छेडछाडीचा आरोप केला होता, त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, त्या स्ट्राँगरूमला एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा असतांना तिथे एखादी व्यक्ती जातेच कशी? सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीचे ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवलेत ते देखील सीसीटीव्ही बंद झाले होते.   शिरूरमध्ये देखील तसाच प्रकार झाला. जर अशा पद्धतीने निवडणूक आयोगाकडून हलगर्जीपणा होत असेल तर त्यांच्या कार्यपद्धतीबाबत शंका आपण घेऊ शकतो असं रोहित पवार म्हणाले. सोबतच अहमदनगरच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरून रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जिल्हाधिकारी यांना इशारा दिला आहे. तुम्ही सत्ताधाऱ्यांचा ऐकत असाल तर उद्या महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अशा लोकांचं काय करायचं हे आम्ही पाहू असा सज्जड दमच रोहित पवार यांनी दिला.

काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटलांसह विश्वजीत कदमांची हजेरी, रोहित पवार म्हणाले...

 सांगलीत निवडणुकीत राबलेल्या कार्यकर्त्यांसाठी काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटलांसह विश्वजीत कदमांनी हजेरी लावली.त्यामुळे काँग्रेसचा पाठिंबा कोणाला असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले,  विशाल पाटील तेथे जेवायला का आले हे त्यांनाच विचारलं पाहिजे मात्र जेवायला कोण येत असेल तर ती आपली संस्कृती आहे.  जेवायला कोणी नाही म्हणू नये.