ठाणे: डोंबिवलीत असणाऱ्या एमआयडीसी परिसरात गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटाचे नेमके कारण आणि तीव्रता अद्याप समजू शकलेली नाही. मात्र, डोंबिवली एमआयडीसीपासून (Dombivli MIDC) लांबच्या अंतरावर असलेल्या परिसरातूनही आकाशात उठत असलेले काळ्या धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसत आहेत. यावरुन स्फोटाची तीव्रता जास्त असल्याचा अंदाज बांधला जात आहे. एमआय़डीसीतील कंपनीतील बॉयलरमधे ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. एमआयडीसी फेज-२ मधील कंपनीत ब्लास्ट झाल्याचे सांगितले जाते. 


प्राथमिक माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील अमुदान या कंपनीतील बॉयलरमध्ये हा स्फोट झाला आहे. मात्र, हा स्फोट झाल्यानंतर डोंबिवली परिसरातील अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले. त्यामुळे या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. हा स्फोट शक्तिशाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता स्फोटात किती जीवितहानी झाली आहे, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सध्या याठिकाणी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. या दुर्घटनेत सहा ते सात कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. 


याठिकाणी अजूनही स्फोट सुरु असल्याचेही समजते. त्यामुळे ही आग आणखी दूरवर पसरण्याची शक्यता आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आग नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, सध्या एमआयडीसीच्या आजुबाजूच्या परिसरात स्फोटाच्या हादऱ्याने पडझड झाल्याचे दिसत आहे. 


एमआयडीसीतून बाहेर पडलेल्या कामगाराची प्रतिक्रिया


या भीषण स्फोटानंतर एमआयडीसीतून बाहेर पडलेल्या एका कामगाराने एबीपी माझाशी संवाद साधला. त्याने सांगितली की, स्फोट झाला ती आमच्या बाजूची कंपनी होती. इतका मोठा स्फोट होता की, आम्ही सगळे बाहेर पडलो. सगळे आगीचे लोळ येत होते. आमच्या हाताला भाजले आहे, असे कामगाराने सांगितले.


काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार,  मोठे स्फोट झाले, दोन ते तीन किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले. अनेकांच्या घरांच्या काचेच्या खिडक्या फुटल्या आहेत. अग्निशमन दलाकडून अतिरिक्त कुमक मागवून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न  सुरु आहेत. आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये जाणे अद्याप शक्य झालेले नाही. अजूनही याठिकाणी स्फोट सुरु आहेत.


बॉयलर्सचे तुकडे दीड किलोमीटर अंतरावर पडलेत, सगळ्या सोसायट्यांमधील इमारतींच्या काचा फुटल्या आहेत: स्थानिक प्रत्यदर्शीची माहिती


या कंपनीत स्फोट एक-सव्वाच्या आसपास झाला. या स्फोटामुळे दीड किलोमीटर परिसर हादरुन गेला, दीड किलोमीटरमधील गाड्यांच्या आणि बिल्डिंगच्या काचा फुटल्या आहेत. लोक भूकंप आला त्याप्रमाणे पळत होते. आजुबाजूच्या परिसरातील एकाही सोसायटीच्या काचा राहिलेल्या नाहीत, सगळ्या काचा तुटून गेल्या आहेत. अनेक लोक जखमी झाले आहेत, मोठी मनुष्यहानी झाली असावी. बॉयलर्सचे जे तुकडे उडाले ते दीड किलोमीटर अंतरावर पडले आहेत. हे तुकडे चारचाकी गाड्यांवर पडून गाड्या दबल्या आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवाशी संजय चव्हाण यांनी दिली.  


कंपनीतील केमिकल ड्रम्सच्या साठ्यामुळे स्फोटांची मालिका, अग्निशमन दलाला आत शिरता आलेले नाही: माजी नगरसेवक मंदार हळबे


आता थोड्यावेळापूर्वी स्फोट झाला आहे. लांबच्या अंतरापर्यंत धूर पसरला आहे. आम्ही साधारण 20-25 जखमी लोकांना धावताना पाहिले आहे. अजूनही कंपनीत ठेवलेल्या केमिकल ड्रमचे स्फोट होत आहेत, अशी माहिती डोंबिवलीतील माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी दिली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. कंपनीतून सध्या धुराचे प्रचंड लोट बाहेर येत आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाला आतमध्ये जाणे शक्य होत नसल्याचे मंदार हळबे यांनी सांगितले. 


सात वर्षांपूर्वीच्या स्फोटाच्या भीषण आठवणी जाग्या


डोंबिवली एमआयडीसी भाग ही रहिवासी परिसराला लागून आहे. केमिकल कंपन्या असलेल्या भागातच नागरी वस्तीही आसपास आहे. या कारणामुळे स्फोट आणि आगीच्या घटनेचे परिणाम वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे 2016 मध्ये डोंबिवली एमआयडीसीतील प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यावेळीही एकामागून एक स्फोट झाल्याने घटनेची तीव्रता वाढली होती.

डोंबिवलीतील पाच किलोमीटरपर्यंतचा परिसर या स्फोटानं पुरता हादरुन गेला होता. या स्फोटात तब्बल 12 जण दगावले होते. तर, तब्बल 183 जण जखमी झाले होते. प्रोबेस कंपनीत झालेला हा केमिकल स्फोट इतका शक्तिशाली होता की, कंपनीची इमारत जमीनदोस्त झाली होती. ज्याठिकाणी स्फोट झाला, त्या ठिकाणी 10 फुटांचा खोल खड्डा पडला होता. याव्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर कंपन्यांच्या इमारतींचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते.


स्फोटामुळे 25 ते 30 जण जखमी, मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती


एका कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन आग लागली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी की, आजुबाजूच्या रहिवासी इमारतींमधील काचा फुटल्या. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर लोक जखमी झाले आहेत. आतापर्यंत जखमी झालेल्या 25 ते 30 जणांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.


आग आणखी भडकली, आजुबाजूच्या कंपन्यांमधील केमिकल साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यास धोका


आग आजुबाजूच्या कंपन्यांमध्ये पसरायला सुरुवात झाली आहे. अन्य कंपन्यांमध्येही केमिकलचा मोठा साठा आहे. हा साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला तर आगीची आणि स्फोटांची तीव्रता कैकपटीने वाढू शकते. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरातील सर्व अग्निशमन केंद्रातील गाड्या डोंबिवली एमआयडीसी परिसरात बोलावून घेण्यात आले आहे. 


डोंबिवली MIDC स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया


डोंबिवलीतील एमआयडीसी स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, घटनास्थळी रेस्क्यू टीम, जिल्हाधिकारी आणि खासदार पोहोचले आहेत. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. माझ्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


अग्निशमन दलाच्या जवानांकडून लांबच्या अंतरावरून पाण्याचा मारा


डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीच्या परिसरात धुराचे लोट आणि आगीची तीव्रता इतकी जास्त आहे की, अग्निशमन दलाच्या जवानांना कंपनीच्या गेटवरुनच पाण्याचा मारा करावा लागत आहे. कंपनीत अजूनही रसायनांचे अनेक ड्रम आहेत. आगीमुळे या ड्रमचा स्फोट होत आहे. त्यामुळे आग कमी होताना दिसत नाही. आगीची धग कमी झाल्याशिवाय अग्निशमन दलाला आतमध्ये शिरता येणे शक्य नाही.