Rohit Pawar: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये दोन ठाकरे बंधूंच्या मिलनाची चर्चा सर्वाधिक सुरू आहे. शिवसेना आणि मनसेच्या युती संदर्भातील चर्चा होत असतानाच हिंदीच्या सक्तीकरणाविरोधात आता दोन ठाकरे बंधूंनी दंड थोपटले आहेत. विराट मोर्चा काढण्याची घोषणा शिवसेना आणि मनसेकडून करण्यात आली होती. तो मोर्चा आता राज आणि उद्धव यांच्या उपस्थितीत एकत्रित निघणार आहे. या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत दोन ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची घोषणा केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या मिलनाची चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांकडूनही प्रतिक्रिया आली आहे.
महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे. त्यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मराठी साठी दोन्हीभाऊ एकत्र येत असतील मराठी मनांसाठी हा अत्यंत आनंददायी क्षण असेल. मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे मोर्चाच्या आधीच सरकारला नमते घ्यावे लागेल.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की हे ट्विट बघून महाराष्ट्रद्रोहींचा प्रचंड जळफळाट झाला असेल. कुटुंब एकत्र असेल तर स्वागताच असल्याचं रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे दुसरीकडे शिवसेना, मनसे नेत्यांकडूनही या निर्णयाचे स्वागत केलं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या