Rohit Pawar on Baramati Loksabha : बारामती लोकसभेसाठी (Baramati Loksabha) औपचारिकपणे सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे नाव निश्चित झाल्यानंतर बारामतीमध्ये आता अधिकृतपणे राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभेवरून अजित पवार गट आणि शरद पवार गटांमध्ये घणाघाती प्रहार सुरू आहेत. दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी तसेच भावनिक आवाहन सुद्धा केलं जात आहे. 


या सर्व पार्श्वभूमीवर आता थेट लढाईला सुरुवात झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपवर आणि अजित पवारांवर तोफ डागली आहे. त्यांनी ट्विट करून बारामतीकर भाजपचे दात त्यांच्याच घशात घालून पत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दात हल्लाबोल केला आहे. 


पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे


रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटला आहे की बारामतीतून सुप्रियाताई लढणार हे आधीच निश्चित होतं, त्यामुळं पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे त्यांच्यासोबत गेलेले आपले लोक कदाचित यशस्वी होऊ देणार नाहीत, असं वाटत होतं. दुर्दैवाने आज भाजपची चाल यशस्वी ठरली असली तरी बारामतीची जनता स्वाभिमानी आहे. आदरणीय पवार साहेबांच्या पराभवासाठी टपून बसलेल्या भाजपच्या या खेळीला बळी न पडता बारामतीकर सुप्रियाताईंना ३ लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून देऊन भाजपचे दात त्यांच्याच घशात घालून चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आहे.






दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी उमेदवार निश्चित केल्यानंतर आता त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष टोकाला गेला आहे. अजित पवार सातत्याने मला कुटुंबातून एकटं पाडलं जात आहे, असा हा प्रचार करत भावनिक आवाहन करताना दिसून येत आहेत. या टिकेला शरद पवार गटाकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. 


बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार कुटुंब समोर आल्यानंतर अजित पवारांच्या विरोधात त्यांचा सख्खा भाऊ सुद्धा गेला आहे. श्रीनिवास पवार यांचे कुटुंब पूर्णतः सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभा राहिलं असून त्यांनी सुद्धा सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे या आता लढाईमध्ये कोण बाजी मारणार? याचे उत्तर आता चार जून रोजी मिळणार आहे. बारामती लोकसभेला सात मे रोजी मतदान होणार असून प्रचाराला आता अधिकृतपणे वेग आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या