मुंबई: मला कुणासमोर वाकायला आवडत नाही, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी वक्तव्य केलं आहे. अधिकाऱ्यांना मी सहकार्य करत होतो, त्यावेळी अनेक अधिकाऱ्यांना कळत नव्हतं काय करायचं, कारण तुमचे सर्व आवाज त्या ठिकाणी पोहोचत होतं, घोषणा ऐकू येत होत्या असं रोहित पवार म्हणाले. एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो, त्याच्यावर कुठेतरी अन्याय होतो असं ज्यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला समजलं त्यावेळी बाप माणूस म्हणून मागे उभे राहतात. ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर रोहित पवारांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली.
एखादा कार्यकर्ता लढत असताना पवार साहेब त्याच्या मागे राहतात, ते पळणाऱ्याच्या मागे राहत नाही असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लावला.
बारामती अॅग्रो कथित घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांची ईडीने तब्बल 12 तास चौकशी केली. त्यांना आता पुन्हा 1 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर ईडी कार्यालयातून बाहेर आलेल्या रोहित पवारांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं. रोहित पवारांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतलं आणि ईडीच्या बाजूला असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडले.
काय म्हणाले रोहित पवार? (ED Action On Baramati Agro)
कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार रोहित पवार म्हणाले की, दिल्लीसमोर हा महाराष्ट्र कधीच झुकणार नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांना मी पूर्ण सहकार्य केलं आहे. आपल्या स्वार्थासाठी पक्ष सोडणाऱ्यांनी आणि अडचणीत आल्यानंतर पक्ष सोडणाऱ्यांना एक संदेश देतो, पवार साहेबांनी अनेक युवा कार्यकर्ते उभे केले. पण आपला एखादा कार्यकर्ता अडचणीत आला तर पवार साहेब हे लढणाऱ्याच्या मागे राहतात, पळणाऱ्याच्या मागे नाही.
राज्यात विद्यार्थ्यांचे, तरुणांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न समोर आहेत. हे प्रश्न सोडवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलं असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. ईडीच्या चौकशीला घाबरून थांबणार नाही, या पुढे सर्वांनी लढण्याची भूमिका घ्यावी असं सांगत यापुढेही आपण राज्यातील प्रश्नावर लढत राहणार असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवारांवर आरोप काय? (ED Action On Baramati Agro)
कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी झाल्यावर त्याचा शिखर बँकेने लिलाव केला. या लिलावाच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप होता. 50 कोटी रूपयांत बारामती अॅग्रोने या कारखान्याची खरेदी केल्याचा आरोप आहे. या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकांतले व्यवहार संशयास्पद असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.
बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्या लिलावात सहभागी आहेत. हायटेक कंपनीने लिलावासाठी पाच कोटी रूपयांची रक्कम भरली होती. ती रक्कम बारामती अॅग्रोकडून घेतल्याची चर्चा आहे. विविध बँकांतून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती अॅग्रोने कारखाना खरेदीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा: