मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रोवर (Baramati Agro) मध्यरात्री 2 वाजताचा मुहूर्त साधत कारवाई करण्यात आली. एक डीसलरी प्लँट 72 तासात बंद करण्याचे आदेश देण्यात आले. पण रोहित पवारांवर कारवाई करण्यासाठी मध्यरात्रीचा साधलेल्या मुहूर्ताची आणि त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टची चर्चा मात्र चांगलीच रंगलीय. राज्यातील दोन बड्या नेत्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचा थेट आरोप रोहित पवारांनी केला आहे. त्यामुळे रोहित पवारांचे बोट त्यांचे काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे आहे का हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 


रोहित पवारांना आतापर्यंत ईडी, अर्थिक गुन्हे शाखा महाराष्ट्र आणि आता प्रदूषण नियंत्रण बोर्ड (Maharashtra Pollution Control Board) यांची नोटीस आली आहे. गुरूवारी मध्यरात्री त्यांच्या बारामती अॅग्रोवर कारवाई करत 72 तासात प्लँट बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. या कारवाईसाठी महाराष्ट्र प्रदूषण विभागानं नोटिस धाडली पण त्यासाठी मुहूर्त निवडला तो रात्री 2 वाजताचा. ही कारवाई राज्यातील दोन बड्या नेत्यांच्या सांगण्यावरून केली गेली असल्याचा थेट आरोप रोहित पवार यांनी केला आहे. 


Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवार राज्यातील बडे नेते, रोहित पवारांचे वक्तव्य


या आधी रोहित पवार यांनी ज्या ज्या वेळी अजित पवारांचा उल्लेख केलाय त्या त्या वेळी अजितदादा हे राज्यातील बडे नेते नेते असल्याचं सांगितलं. अजितदादा बडे नेते असल्याने आपण त्यांच्यावर बोलणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता रोहित पवारांवर कारवाई करण्याचा आदेश देणारे त्या दोन बड्या नेत्यांपैकी अजित पवार हे एक आहेत का अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 


Rohit Pawar On Baramati Agro : दुसरा बडा नेता कोण? 


रोहित पवारांवर कारवाईचा आदेश देणाऱ्या त्या दोन बड्या नेत्यांपैकी एक नेता जर अजित पवार असतील तर दुसरा नेता कोण असेल याचीही चर्चा जोरदार आहे. राज्यात सध्या बड्या नेत्यांच्या यादीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावं घेतली जातात. 


वरील नावांपैकी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सध्या सत्तेत नाहीत. त्यामुळे राहतात ते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे. त्यामुळे या तिघांच्या पैकी दोन नेत्यांनी रोहित पवारांच्या संस्थेवर कारवाई करण्याचा आदेश दिला असेल का? असाही प्रश्न निर्माण होतो. 


रोहित पवार डोईजड होतायेत?


राष्ट्रवादी काँग्रेसमून पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवारांचं आतापर्यंतचे काम हे उल्लेखनीय आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाची बाजू सांभाळत रोहित पवारांनी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. तर अजित पवार गटाच्या प्रत्येक नेत्याने रोहित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. यावरून रोहित पवार हे राष्ट्रवादीत डोईजड होत होते का? त्यामुळेच दोन गट पडल्यानंतर सर्वजण त्यांच्यावर तुटून पडले का? 
असे काही प्रश्न पडतात. 


रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांनी यामागे दोन बड्या नेत्यांचा हात असल्याचा थेट आरोप केला आहे. या नेमक्या आरोपामुळे रोहित पवारांना ते बडे नेते कोण आहेत याची माहिती असल्याचं दिसतंय. सोशल मीडियातून आरोप केल्यानंतर आता रोहित पवारांनी थेट त्यांची नावं घेतली तर ते अधिक स्पष्ट होईल. 


 




ही बातमी वाचा: