शिर्डी : शिर्डी जवळील अस्तगाव येथे पाच ठिकाणी सशस्त्र दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी लुटीवेळी केलेल्या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर सहाजण जखमी झाले आहेत. त्यातील तीन गंभीर जखमींना उपचारासाठी शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील नळे आणि खिलारी वस्तीवर दरोडेखोरांनी पहाटेच्या सुमारास दरोडा घालत अनेक मोबाईलसह लाखोंचा ऐवज लुटला. यावेळी सशस्त्र दरोडेखोरांनी पाच घरावर हल्ला करत घराबाहेर झोपलेल्या महिलांचे दागिने ओरबाडले आणि घरातील ऐवज लुटला आहे. दरोडेखोरांचा प्रतिकार करणाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत देऊबाई शिवाजी खिलारी या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करत दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक लॅब, श्वानपथकाच्या मदतीनेही दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात दरोडा
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील गावातली ही घटना आहे. विखे पाटलांनीही घटनास्थळी भेट देत जनतेच्या सुरक्षेविषयी सरकार गंभीर नसल्याने राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप केला आहे.