पुणे : सिंहगड किल्ला एक महिना पर्यटकांसाठी बंद असणार आहे. सिंहगड घाटात दरड पडत असलेल्या भागात संरक्षण जाळ्या बसवण्याचं काम सुरु आहे, त्यामुळे आज 2 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. गडावर जाण्यास इच्छुकांनी पायवाटेचा वापर करावा, असं वन विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.


सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या भागात संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असल्यामुळे महिनाभरासाठी गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. या कालावधीत हा सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्यात दरवर्षी सिंहगड घाट रस्त्यावर दरडी कोसळतात. त्यामुळे घाट रस्ता बंद होतो आणि अनेक पर्यटक गडावर अडकून पडतात किंवा गडावर जाणाऱ्या पर्यटकांना अडथळा निर्माण होतो.


या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या जागांचा अभ्यास करण्यात आला होता. मागील वर्षी काही ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. परंतु दरड कोसळल्यामुळे काही जाळ्या निखळून पडल्या होत्या. वनविभागाच्या वतीने यावर्षी जाळ्या बसवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. या कामासाठी सिंहगडावरील रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.


संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम सुरु असताना मोठे दगड खाली पडू शकतात. त्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या दृष्टीने हा घाट रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याचं वन विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.