मुंबई : राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास उद्धव ठाकरे अजिबात तयार नव्हते, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना शब्द दिलाय की, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणे ही माझी जबाबदारी आहे, असं उद्धव ठाकरे वारंवार सांगत होते, असं शरद पवारांनी सांगितलं.
मात्र स्वत: मुख्यमंत्री बनण्याची उद्धव ठाकरे यांची तयारी नव्हती. तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारचा कारभार सुरळीत चालण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनने आवश्यक होतं. तिन्ही पक्षांची मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाला एकमताने सहमती होती. उद्धव ठाकरे तयार नसल्याने, मी त्यांना त्यांच्या भाषेत मुख्यमंत्री पद स्वीकारण्याचे आदेश दिले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली, असं शरद पवारांनी सांगितलं.
सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे आहे, असं म्हणण योग्य नाही. राज्याच्या कारभार कसा चालेल, याचा किमान समान कार्यक्रम शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्रित बसून तयार केला आहे. राज्याच्या प्रमुखाला सहकार्य करावं, त्यांनी सल्ला मागितला तर तो द्यावा. सतत राज्याच्या प्रमुखाला सल्ले दिल्यास, त्यांना प्रभावीपणे कारभार करणे कठीण होऊ शकतं. त्यामुळे राज्याचं नेतृत्व एकाच व्यक्तीच्या हाती असायला हवं आणि आता राज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरेंच्या हाती आहे, असं माझं मत असल्याचं शरद पवारांनी सांगितंलं.
उद्धव ठाकरे यांचा स्वभाव मला माहित आहे. मुंबई महापालिकेसारख्या संस्था त्यांच्या हातात आहेत. त्यांच्या कामाची पद्धत मला माहित आहे. प्रशासन यंत्रणेला विश्वासात घेऊन काम केल्यास, त्याचा चांगला रिझल्ट मिळतो. दैनंदिन प्रशासनामध्ये हस्तक्षेप करण्याचा उद्धव ठाकरेंचा स्वभाव नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे उत्तम प्रशासक म्हणून काम करतील यात शंका नाही, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
- अजित पवारांनी 'त्या' अटीवर भाजपशी हातमिळवणी केली होती : शरद पवार
- Sharad Pawar Exclusive | शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी सोनिया गांधींना 'या' गोष्टींची आठवण करुन दिली : शरद पवार