हिंगोली : आज सकाळपासूनच सरकळी येथील अनिल खंदारे यांच्या घरात धिरगंभीर वातावरण होते, मुलगी रिया हिचा दहावीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते, दुपारी एक वाजता निकाल जाहिर होताच संपूर्ण कुटुंबच ढसाढसा रडले. लहान भावाचा मृतदेह घरात ठेऊन परिक्षा दिलेल्या रियाने विज्ञान विषयात 79 गुण मिळविलेच तर एकूण 81.20 टक्के गुण मिळविले आहेत.


हिंगोली तालुक्यातील सरकळी येथील रिया अनिल खंदारे ही विद्यार्थीनी हिंगोलीच्या आदर्श विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये होती. तर तिचा एकुलता एक लहान भाऊ गौरव खंदारे आठव्या वर्गात शिक्षण घेत होता. अनिल खंदारे यांनी गॅस एजन्सीवर काम करून प्रतिकुल परिस्थिती असतांना दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. रिया आणि गौरव यांच्यात अभ्यासातही स्पर्धा होत होती.


दरम्यान, 10 मार्च पासूनच गौरवला ताप येऊ लागला. त्याला उपचारासाठी हिंगोली येथून नांदेडला हलविले. मात्र तेथे उपचार सुरु असतांनाच गौरवचा 16 मार्च रोजी पहाटे मृत्यू झाला. तर याच दिवशी रियाचा विज्ञान विषयाचा पेपर होता. घरात लहान भाऊ गौरव याचा मृतदेह असतांनाही मोठं दुःख बाजुला ठेऊन वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी रियाने विज्ञान विषयाचा पेपरही दिला. त्यानंतर दुपारी भावाच्या अंत्यसंस्कारासाठी ती उपस्थित राहिली.


आज दहावीचा निकाल असल्याने खंदारे कुटुंबियांकडे गंभीर वातावरण होते. दुपारी एक वाजता निकाल हाती आला आणि संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एकीकडे लहान भाऊ गेल्याचं दुःख असतानाही तिने 81.20 टक्के गुण मिळविले. यामध्ये नेमका आनंद व्यक्त करावा का आई, वडिलांना सावरायचे हेच रियाला कळेनासे झाले. या प्रसंगातही तिने भावाच्या छायाचित्रासमोर निकालाचा कागद ठेवताच सर्व कुटुंबच ओक्साबोक्सी रडले. त्यांना धिर देण्यासाठी शेजारीही आले. मात्र घरातील प्रसंग पाहून शेजाऱ्यांच्या डोळ्यातही आश्रू आले. आता पुढे वैद्यकिय अभ्यासक्रम पूर्ण करणयाची इच्छा असल्याचे रिया खंदारे हिने सांगितले आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


MAH SSC Result 2020 LIVE | महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, निकालात कोकण विभाग अव्वल


दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के, यंदाही मुलींची बाजी