कोल्हापूर : जिल्ह्यातील मुसळे येथील कोरोना सेंटरमधील रुग्णाचं मित्रासोबत बोलणं झालेली ध्वनीफीत संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल होतं आहे. यामध्ये कोरोना सेंटरमध्ये करण्यात येत असलेल्या सुविधांचा उल्लेख केला आहे. मात्र काही आक्षेपार्ह विधाने देखील या संभाषणात मधून समोर आली आहेत. कुठलीही लक्षणं नसताना कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आणल्याचे देखील या संभाषणात म्हटले आहे. कोरोना सेंटरमध्ये असलेल्या एका रुग्णाने आपल्या मित्राला फोन करून आयजीएमसंदर्भात संवाद साधला आहे.


कोरोना सेंटरमध्ये मिळणाऱ्या सुविधेबद्दल या ध्वनिफीतमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर आयजीएम रुग्णालयात दाखल झाल्यास सरसकट सगळ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याचे आक्षेपार्ह विधानदेखील यावेळी बोलताना केलं आहे. दीड लाखाचा निधी मिळत असल्यामुळे जास्तीत जास्त कोरोना रुग्ण दाखवण्यात येत असल्याचं वक्तव्यही करण्यात आलं आहे.


दिवाळीला कपडे घेऊनच बाहेर येतो आता


या संभाषणात मित्राने कधी बाहेर येणार असं विचारला असता, याठिकाणी एक नंबर चंगळ सुरू आहे. दोन वेळ नाश्ता, दूध, जेवण सगळं काही निवांत मिळतं. आता दोन-तीन महिने बाहेर येणारच नाही. थेट दिवाळीला नवीन कपडे घेऊनच बाहेर येतो. अशा पद्धतीचं वक्तव्य देखील या भाषणांमधून बाहेर आलं आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात या व्हायरल झालेल्या ध्वनीफीतीची खमंग चर्चा सुरु झाली आहे.


कोरोनाच्या संकटात दिवस-रात्र वैद्यकीय यंत्रणा आपली सेवा बजावत आहे. प्रशासकीय यंत्रणा 24 तास कार्यरत आहे. पोलीस कर्मचारी जीवाची बाजी लावत आहेत. अशावेळी पोलिसांनी या ध्वनीफीतची गांभीर्याने दखल घेतली आहे. आयजीएमची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा ठपका ठेवत दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.


आयजीएम रुग्णालय टार्गेट का होतंय?


इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयाबाबत याआधी देखील अनेक तक्रारी आल्या आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांनीदेखील याबाबत आवाज उठवला. काही दिवसांपूर्वीच याच रुग्णालयांमध्ये वाढदिवस साजरा झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आणि आता ही ध्वनीफीत व्हायरल झाली आहे. त्यामुळे आयजीएम रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


कोल्हापूरकरांना आता घरातही मास्क वापरावा लागणार?


"कुणी कितीही आक्षेप घेतला तरी शाळा सुरू करणारचं": विजय वडेट्टीवार