मराठवाड्यात परतीच्या पावसाचा पिकांना फटका
गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाने मराठवाड्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, उडीद, बाजरीचं मोठं नुकसान केलंय. यंदा पेरणीयोग्य पाऊस पडला नव्हता. तरीही मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी खरीपाची लागवड केली. हाताला आलेली पिकं काढण्याचे दिवस होते आणि तोच पावसाने जोरदार हजेरी लावली.
बाजरीचे पीक काढणी काढून ठेवण्यात आले होते. मात्र परतीच्या पावसामुळे बाजरीच्या देठाला पुन्हा अंकुर फुटलाय. कापसाचे ही तसेच बेहाल आहेत. उडीद भुईसपाट झाला. तीळ कधी गळून पडले कळलच नाही. त्यामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिकं डोळ्यादेखत उद्धवस्त होत असल्याचं शेतकऱ्यांना पाहावं लागलं.
विदर्भात खरीप, रब्बी पिकांचं नुकसान
परतीच्या पाऊसामुळे विदर्भातील खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांचंही मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे सोयाबीनसह तूर, हरभरा, ज्वारी, कापूस या रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर डाळींब, पपई, या फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळाल.
परतीच्या पावसाचा कहर, पिकांचं मोठं नुकसान | Beed | ABP Majha
नाशिकमध्ये द्राक्ष आणि कांद्याच नुकसान
परतीच्या पावसाने नाशिक जिल्हयाला चांगलाच तडाखा दिल्याने कांदा आणि द्राक्ष पिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नाशिक जिल्हयात द्राक्ष आणि कांद्याच मोठ्या प्रमाणावर शेतकरी उत्पादन घेत असतो. यंदा पावसाचे उशिरा आगमन झाले त्यामुळे खरीपाच्या कांद्याची लागवड सुध्दा उशिरा सुरु झाली.चांगला पाऊस झाल्याने कांद्याच उत्पादन सुध्दा चांगले निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र परतीच्या पावसामुळे काढणीला आलेला कांदा तर खराब झालाच शिवाय ज्या शेतकऱ्यांनी कांदा रोप टाकली होती ती सुध्दा सततच्या पाण्यामुळे सडून गेल्याने या पुढील काळात बाजारात येणाऱ्या नविन लाल कांद्याच प्रमाण कमी राहिल अशी शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे सध्या लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली असून शिल्लक उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 4000 हजार रुपये तर सरासरी 3500 रुपयांचा दर मिळत आहे.
कांद्या बरोबरच जिल्हयातील बागलाण तालूक्यात अर्ली येथे जवळपास दिडशे हेक्टरवरील द्राक्ष खराब झाली आहे. आत्तार्यंत संपूर्ण बागलाण तालूक्यातील द्राक्ष उत्पादकांचे अंदाजे चारशे कोटीं पेक्षा जास्त नुकसान झाल्याच सांगण्यात येत आहे. सध्या काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु असून, त्यानंतरच नुकसानीचा खरा आकडा समजणार आहे.
Rain Damage | परतीच्या पावसाचं पाणी कांद्याच्या शेतात, मनमाडमध्ये परतीच्या पावसाचा कांद्याला फटका | नाशिक | ABP Majha
औरंगाबादमध्ये परतीच्या पावसाचा फटका
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. सतत झालेल्या पावसाने सिल्लोड-सोयगाव कन्नड या भागातील अनेक पिकांना फटका बसला आहे. वैजापूर-गंगापूरमध्ये आताही हीच स्थिती आहे. यामुळे शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी नवनिर्वाचित आमदारांना शेतकऱ्यांच्या रोषाला देखील सामोरं जावं लागलं.
सिल्लोड सोयगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी या अस्मानी संकटामुळे हवालदिल झाला असून खरिपाची सर्व पिके वाया गेली आहेत. परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड येथे उद्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.