मुंबई : महाराष्ट्रात अतिप्रदूषित भागातील रहिवाशांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. यात प्रामुख्याने औद्योगिक जास्त प्रदूषण असलेले मुंबई आणि पुणे देशातील संवेदनशील ठिकाणांपैकी एक असल्याचे समोर आले आहे.
हवेत विविध प्रकारचे सूक्ष्मकण असतात. धूळ, काजळी आणि धूर यांचे मिश्रण असलेले हे कण हानिकारक असतात. हवेत वेगवेगळ्या आकाराचे सूक्ष्म कण असतात. धूळ, परागकण, काजळी आणि धूर यांचे मिश्रण असलेले हे कण हानिकारक असतात. यापैकी पीएम 2.5 या छोट्या कणांचा व्यास 2.5 मायक्रोमीटरहून कमी असतो. हे कण अनेक दिवस किंवा आठवडे हवेत राहू शकत असल्याने तसेच फुप्फुसात प्रवेश करू शकण्याइतके सूक्ष्म असल्यामुळे आरोग्यावर मोठा परिणाम घडवू शकतात, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अभ्यासात खालील निरीक्षणे नोंदवण्यात आली
1. पीएम 2.5 चे उत्सर्जनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
2. पीएम 2.5 च्या दरडोई उत्सर्जनात महाराष्ट्र उत्तर प्रदेशच्या पुढे आहे.
5. महाराष्ट्रात 5 नोव्हेंबर 2020 पर्यंत 17.19 लाख कोरोना रुग्ण नोंदवले गेले. ही संख्या भारतात सर्वाधिक होती.
4. संशोधनात सहभागी 16 शहरांमध्ये वाईट हवा गुणवत्ता दिवसांच्या यादीत मुंबई आणि पुण्याचा अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक आहे
5. मुंबईत 2.64 लाख करोनाबाधित आणि 10 हजार 445 कोरोना मृत्यू नोंदवले गेले. पुण्यात 3.38 लाख करोना रुग्ण व 7 हजार 60 मृत्यू नोंदवले गेले.
अहवालातील 16 शहरांत मुंबई, पुणे
संशोधनासाठी देशभरातील विशिष्ट विभाग वेगवेगळ्या संवेदनशील प्रदेशांमध्ये विभागण्यात आले होते. 36 राज्यांमधून 16 शहरांपैकी मुंबई आणि पुणे या दोन शहरांची महाराष्ट्रातून निवड करण्यात आली होती. संशोधकांनी संपूर्ण देशातून वर्षभरातील सूक्ष्मकणांच्या (पीएम 2.5) प्रदूषणाचे एकूण उत्सर्जन हाय रिझोल्युशन ग्रीड (10 किमी बाय 10 किमी) पद्धतीने मोजले. त्यांनी उत्सर्जनाची नवीन आकडेवारीही बनवली. ज्याचा कोविड-19 पॉझिटिव्ह केसेस आणि मृत्यूच्या आकडेवारीसह विश्लेषण केले गेले. संशोधनाला देशभरातील 16 ठिकाणांहून गोळा केलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या आकडेवारीचाही आधार आहे. संशोधनात मार्च ते नोव्हेंबर 2020 या काळातील कोरोना केसेसचे निरीक्षण करण्यात आले तर राष्ट्रीय पीएम 2.5 उत्सर्जनाच्या प्रमाणाचे आधारवर्ष 2019 गृहीत धरले होते.
संशोधक डॉ. साहू म्हणाले, मुंबई आणि पुण्याशिवाय उच्च प्रदूषण पातळी असलेले नागपूर आणि चंद्रपूर या आणखी दोन संवेदनशील ठिकाणी कोविड-19 केसेस आणि मृत्यू जास्त असल्याचे संशोधनात आढळले. जरी ही दोन शहरं थेट संशोधनात समाविष्ट नसली तरी दोन्ही ठिकाणी प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक आणि उर्जा प्रकल्पांच्या उपस्थितीमुळे ती महाराष्ट्रातील संवेदनशील ठिकाणं ठरतात.
संशोधकांमध्ये भुवनेश्वरच्या उत्कल विद्यापीठाचे डॉ. सरोज कुमार साहू, पर्यावरण शास्त्र अभ्यासक पूनम मंगराज, आयआयटीएम पुणेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ गुफरान बेग, शास्त्रज्ञ सुवर्णा टिकले, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राऊरकेलाचे भीष्म त्यागी व आयआयटी भुवनेश्वरचे व्ही. विनोज यांचा समावेश आहे