Omicron Variant : जगाची धाकधुक वाढवणाऱ्या ओमायक्रॉननं आता देशासह राज्याचीही चिंता वाढवली आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या (Omicron Varient) आता 10 वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनच्या वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य सरकार अलर्टवर आहे. लहान मुलांचं लसीकरण आणि बुस्टर डोससाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं आहे. जिनोम सिक्वेन्सिंग तपासणीची औरंगाबाद आणि नागपूरमध्ये नवीन लॅब तयार करणार असल्याचं टोपेंनी यावेळी सांगितलं. 


राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची आकडेवारी 



  • मुंबई : 02

  • पुणे : 01

  • पिंपरी-चिंचवड : 06

  • डोंबिवली : 01


मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण 


मुंबईत ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. परदेशातून मुंबईत आलेल्या दोघांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यामुळं महापालिका प्रशासन सज्ज झालं आहे. दक्षिण आफ्रिकाहून 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. या व्यक्तीसोबत राहिलेल्या अन् अमेरिकेतून आलेल्या 36 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत , हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.  या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पाच अतिजोखमीच्या आणि 315 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे, अशी माहितीही पालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. 


पाहा व्हिडीओ : Omicron चं संकट, महाराष्ट्र अलर्ट, मुंबईतल्या धारावीत पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव



पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच कुटुंबात सहा रुग्ण 


पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा रुग्णांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.


पुण्यातील व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण


पुण्यातील 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. हा व्यक्ती काही दिवसांपूर्वी फिनलँड देशात गेला होता.  29 तारखेला त्या व्यक्ताला ताप आला होता. त्यामुळे त्या व्यक्तीनं कोरोना चाचणी केली. यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला होता. या व्यक्तीने कोविशिल्ड लस घेतली आहे. या व्यक्तीला कोणतीही लक्षणं नाहीत. प्रकृती स्थिर आहे.


डोबिंवलीत 6 जण कोरोना पॉझिटिव्ह, जिनोम सिक्वेंसिंग अहवालाची प्रतिक्षा 


नायजेरियातून डोंबिवलीत आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. या चौघांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलं असून, त्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांची तपासणी करण्यात आली असता कोरोनाबाधित व्यक्तीचा भाऊ आणि त्याच्या आईची चाचणी कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. 


निर्बंध लावणे लोकांसाठी जाचक : आरोग्यमंत्री राजेश टोपे 


ओमायक्रॉन रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार अलर्ट झालं असलं तरी मात्र सध्याच निर्बंध लावणं लोकांसाठी जाचक आणि कठीण असून यासंदर्भात परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान दर सोमवारी होणाऱ्या टास्क फोर्सच्या बैठकीत लहान मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोससाठीचा आग्रह केंद्राकडे धरला जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. याशिवाय राजकीय बैठका मेळावे या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचं देखील राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :