मुंबई : नांदेडच्या (Nanded Hospital Death Case) डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयांमध्ये 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा आणि त्यानंतरच्या 24 तासात सात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठात्यांना शौचालय साफ करण्यास सांगितले. या घटनेवर नाराजी व्यक्त होत असताना आता निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने (MARD) आक्रमक पवित्रा घेतला आहे. खासदार पाटील (MP Hemant Patil) यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन पुकारण्यात येईल असे मार्डने म्हटले आहे.
नांदेड (Nanded) येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांबरोबर खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या गैरवर्तवणुकीसंदर्भात सेंन्ट्रल मार्ड आक्रमक झाली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी, अन्यथा डाॅक्टर्स महाराष्ट्रभर आंदोलन पुकारतील असा इशारा मध्यवर्ती मार्डचे अध्यक्ष डॉ. अभिजीत हेलगे यांनी दिला आहे. घडलेल्या प्रकारामुळे फक्त अधिष्ठाता यांचे मानसिक खच्चीकरण झालेले नाही तर संपूर्ण डॉक्टरांसाठी अपमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले.
खासदार हेमंत पाटील यांनी माफी न मागितल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे महासचिव राहुल मुंडे यांनी दिला आहे. सोबतच राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्यास सरकार जबाबदार राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
राज्य सरकारनं शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयातील औषधांच्या तुटवडा दूर करावा, डॉक्टरांवर त्याचे खापर फोडण्याऐवजी रुग्णांना मदत करावी असेही मध्यवर्ती मार्डने म्हटले आहे.
प्रकरण काय?
डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयांमध्ये 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा आणि त्यानंतरच्या 24 तासात सात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापले आहे. एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी आज या रुग्णालयात येऊन पाहणी केली. यावेळी नांदेड- रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. हे पाहिल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांची धक्कादायक कृती समोर आली आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना (डीन) स्वच्छतागृह साफ करायला लावलं आहे. एवढच नाही तर हेमंत पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाला खडेबोल सुनावले.
रुग्णालयातील स्वच्छतागृह हे अतिशय घाणेरड्या स्थितीत होते.अनेक शौचालय हे ब्लॉक होते. काही ठिकाणी तर स्वच्छतागृहात देखील नव्हते, असे खासदार हेमंत पाटील यांनी म्हटले.