मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Ajit Pawar Faction) अजित पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी अजित पवार गटाचे आमदार, नेते उपस्थित होते. मात्र, अजितदादा कुठं आहेत, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच कारणस्तव अजित पवार हे आजच्या कॅबिनेटमध्ये उपस्थित राहू शकले नाही. तर, दुसरीकडे अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा देखील जोर धरू लागली आहे. 


राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाचा अद्याप न सुटलेला पेच यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे-फडणवीसांवर मोठा दबाव असल्याची चर्चा आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील अजित पवार हे अनुपस्थित होते.  त्यामुळे त्याच्या नाराजीची अधिकच चर्चा सुरू झाली आहे. 


राष्ट्रवादीच्या बैठकीला कोणाचे मार्गदर्शन?


देवगिरी बंगल्यावर झालेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची आजची बैठक राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. अजित पवार हे देवगिरी निवासस्थानी आहेत. मात्र आजारी असल्यामुळे अजित पवार या बैठकीत सहभागी झाले नाहीत. काही वेळापूर्वी ही बैठक संपली आहे. अजित पवारांना ताप आणि थ्रोट इन्फेक्शन झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


हा तर गैरसमज करण्याचा प्रयत्न, तटकरेंची स्पष्टोक्ती


अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले. अजित पवार अजिबात नाराज नाहीत. मात्र, त्यांची प्रकृती बरी नसल्याचे त्यांनी म्हटले. अजित पवार नाराज नाहीत, त्यामुळे कोणतेही गैरसमज पसरवू नये असे आवाहन तटकरे यांनी केले. विरोधकांनी कितीही सांगितले तरी सरकार मजबूत असल्याचेही त्यांनी म्हटले. 


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. हे दोन्ही नेते अचानक दिल्लीला गेले असल्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिंदे आणि फडणवीस आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.


असं असलं तरी अजित पवारांची (Ajit Pawar) नाराजी आणि राष्ट्रवादीकडून वाढता दबाव हे या दिल्ली दौऱ्यामागचं कारण आहे का असाही प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.  परंतु राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.