Renapur Nagar Panchayat Result :  राज्यातील 246 नगरपालिका आणि 54 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे (Election) निकाल आज हाती आले आहेत. बहुतांश जागेवर नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. तर, काँग्रेसला 34, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 7 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 8 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने (BJP) 100 पेक्षा जास्त जागांवरील नगरपालिकेत सत्ता काबिज केली असून जवळपास 120 नगराध्यक्ष भाजपचे झाले आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यात रेणापूर नगरपंचायतींवर भाजपनं झेंडा फडकवला आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव जेशमुख आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. 

Continues below advertisement

17 सदस्यांच्या नगरपंचायतीत भाजपाने 10 जागांवर विजय

दिवंगत विलासराव देशमुख आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीचा वारसा लाभलेल्या रेणापूर नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपाने आपली सत्ता कायम राखली आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून जोरदार आव्हान देण्यात आले होते, मात्र अखेर भाजपाने रेणापूर आमचंच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. रेणापूर नगरपंचायत निवडणूक यावेळी अतिशय चुरशीची ठरली. नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून आजवर भाजपाचीच सत्ता असून, ही परंपरा यंदाही कायम राहिली आहे. भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा आकनगिरे यांनी 2 हजार 576 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 17 सदस्यांच्या नगरपंचायतीत भाजपाने 10 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला 5 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 1 जागा, तर 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

विलासराव देशमुख यांनी रेणापूरमध्ये कायमच गोपीनाथ मुंडे यांना बाय दिला होता

रेणापूर हा भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा प्रभावी मतदारसंघ मानला जातो. लातूर आणि बीड जिल्ह्यातील काही गावांचा समावेश करून रेणापूर मतदारसंघ अस्तित्वात आला होता. त्या काळापासून रेणापूरने सातत्याने भाजपाला पाठिंबा दिला आहे. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री राज्यभर चर्चेचा विषय होती. विलासरावांनी रेणापूरमध्ये कायमच गोपीनाथ मुंडे यांना बाय दिला होता. मात्र हे दोन्ही दिग्गज नेते काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर येथील राजकारण अधिक टोकदार झाले आहे.

Continues below advertisement

रेणापुरमधील सत्ता संघर्षाचे राजकारण

रेणापुर नगरपंचायत ही लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येते. या मतदारसंघावर दीर्घकाळ देशमुख परिवाराचे वर्चस्व राहिले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपाचे रमेश कराड यांनी धीरज देशमुख यांचा पराभव करत प्रथमच भाजपाला आमदारकी मिळवून दिली. त्या पराभवानंतर धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीणमध्ये प्रतिष्ठा पणाला लावत काम सुरू केले होते आणि त्याची पहिली कसोटी म्हणून रेणापुर नगरपंचायत निवडणुकीकडे पाहिले जात होते. या निवडणुकीसाठी धीरज देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात यंत्रणा कार्यान्वित केली होती. विविध पक्ष आणि संघटनांना एकत्र आणत ‘बेरजेचे राजकारण’ करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात अपेक्षित यश मिळाले नाही.

या संपूर्ण निवडणुकीचे सूत्र आमदार रमेश कराड यांच्याकडे होती

रेणापुर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांनी आपल्या कार्यकाळातील विकास कामांच्या आधारे जनतेकडे मतांची मागणी केली. यावेळी उमेदवार म्हणून त्यांची आई शोभा आकनगिरे रिंगणात होत्या. विकासाच्या मुद्द्यावर मिळालेला विश्वास त्यांच्या विजयात निर्णायक ठरला. या संपूर्ण निवडणुकीचे सूत्र आमदार रमेश कराड यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हाताळले आणि भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवून दिले.