राज्यात सर्व पक्ष सत्तास्थापन करण्यात असमर्थ ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याचा मोठा फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना बसला आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे रुग्णांच्या मदतीसाठीचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद करण्यात आला होता. त्यामुळं राज्यातील 5 हजार 657 रुग्ण मृत्यूच्या छायेत असल्याची बातमी एबीपी माझाने प्रसारीत केली होती. या बातमीनंतर राजकीय नेत्यांना जाग आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तात्काळ चालू करावा यासाठी शिवसेनेचे उपनेते उदय सामंत मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना पत्र दिलं आहे. तर आज सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली.
"मा. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारीजी यांची आज सकाळी राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी केली. लगेच कारवाई करण्याचे मा. राज्यपाल महोदयांनी मान्य केले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी विनंती केली. मा. राज्यपाल महोदयांनी यावर सुद्धा तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले". असे ट्वीट मुख्यमंत्रींनी राज्यपालांच्या भेटीनंतर केलं आहे.
धनंजय मुंडे यांचे ट्वीट -
"मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्या संदर्भातील पत्र मी मा. राज्यपालांना लिहिले आहे. मा. राज्यपाल महोदय या पत्राची दखल घेत हजारो गरीब रुग्णांना दिलासा देतीलच अशी अपेक्षा आहे".
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यापासून तर कक्षाचे काम पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. त्यामुळं मदतीच्या अपेक्षेत असलेल्या 5 हजारपेक्षा अधिक रुग्णांचे आयुष्य सध्या अधांतरी असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून आतपर्यंत सुमारे 21 लाख रुग्णांना गेल्या 5 वर्षात 1600 कोटींची मदत करण्यात आली आहे. सध्या कक्ष बंद असल्याचा फलक काढला आहे. मात्र, अर्ज घेणार की नाही हे मात्र 2 नंतर समजले नाही.