महापालिकेच्या कंत्राटदार कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणात कर चुकवलाच, पण आर्थिक गैरव्यवहारही केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. आर्थिक गैरव्यवहार 735 कोटी इतका असून हा आकडा आणखी वाढू शकेल, असा दावा आयकर विभागाने केला.
6 नोव्हेंबरला आयकर विभागाने मुंबई आणि सुरत येथील 37 ठिकाणी छापे घालून चौकशीला सुरुवात केली. ही ठिकाणे मुंबई महापालिकेचे कंत्राटदार आणि त्यांना गैरव्यवहारात सहकार्य करणाऱ्या अन्य कंपन्या, वित्तीय संस्थांशी संबंधित आहेत. सात ठिकाणांवर चौकश सुरू होती. या कारवाईतून कंत्राटदार आणि त्यांच्या कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणावर कर बुडवल्याचे तसेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुरावे हाती लागल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या आयुक्त आणि प्रवक्त्या सुरभी अहलुवालिया यांनी दिली.
आयकर विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएस इन्फ्रा, वनवर्ल्ड टेक्सटाइल ग्रुप आणि स्काय वे-रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंत्राटदार कंपन्यांची कार्यालये, प्रमुखांची निवासस्थाने आदी ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेने आरपीएस इन्फ्रा आणि रेलकॉन या कंपन्यांना 2017 मध्ये काळ्या यादीत टाकले होते.
कंत्राटदार आणि त्यांच्या कंपन्यांनी हा गैरव्यवहार करण्यासाठी बनावट कंपन्या निर्माण केल्या. तसेच अस्तित्वात असलेल्या कंपन्या, वित्तीय संस्थांना हाताशी धरल्याचे समोर आले आहे. महानगरपालिकेत भाजपाचे 83, शिवसेनेचे अपक्षांसह 94, काँग्रेसचे 29 आणि राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक आहेत.