मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील प्रचंड वाढले आहेत. त्यातच रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत महत्वाचे असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना मिळत नाही. मात्र दुसरीकडे परभणी आणि नागपूरमध्ये चक्क कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या नर्सकडूनच रेमडेसिवीर काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे. 


नागपूरात प्रियकराच्या मदतीनं रेमडेसिवीरचा काळाबाजार करणा-या  नर्सला अटक


 कोविड सेंटरमधून रुग्णाचे रेमडेसिवीर इंजेक्शन चोरून प्रियकराच्या मदतीनं त्याचा काळाबाजार करणा-या एका नर्स आणि तिच्या प्रियकराला नागपूर पोलिसांनी अटक केलीय. ज्योती अजित असं अटक करण्यात आलेल्या नर्सचं नाव असून शुभम अर्जुनवार असं तिच्या प्रियकराचं नाव आहे. ज्योती नागपूर जिल्ह्यातील एका कोविड सेंटरमध्ये नर्स म्हणून काही दिवसांपूर्वीच लागली होती. तिथे आलेल्  रेमडेसिवीर चोरून ती आपल्या प्रियकर शुभमच्या मदतीनं ब्लॅकमध्ये विकायची. वाठोडा स्मशानभूमीबाहेर रविवारी संध्याकाळी शुभम रेमडिसेवीर विकताना पोलिसांनी आढळून आल्यानंतर पोलिसांना त्याला पकडलं.  शुभमची झडती घेतल्यानंतर पोलिसांना रेमडेसीवीरसह पाच विविध अत्यावश्यक व्हायल्स त्याच्याकडे सापडले.  चौकशी केल्यानंतर त्याच्या मैत्रिणीनं कोविड सेंटरमधून रेमिडेसिवीर चोरल्याची माहिती पोलिसांना त्यांनं दिली. ज्योतीनं रेमिडेसेवीर चोरल्यानंतर शुभम ते रेमिडेसिवीर ब्लॅकमध्ये विकत होता. वाठोडा पोलिसांनी या दोघांनाही अटक केलीय.


परभणीत नर्सनेच विकले 7 रेमडेसिवीर इंजेक्शन 


 परभणीत एक इसम रेमडेसिवीर  इंजेक्शन विक्री करत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळाले त्यावरून त्यांनी सापळा रचत दत्ता शिवाजी भालेराव या युवकाला इंजेक्शन विकताना रंगेहाथ पकडले.  त्यावरून त्याची चौकशी केली असता त्याने परभणीतील जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या नर्सकडून एक इंजेक्शन 12 हजार रुपयांना घेऊन 15 हजारांना विक्री केल्याचे सांगितले. आतापर्यंत या दोघांनी 5 इंजेक्शन विक्री केले असून 2 विक्री करताना त्यांना पकडण्यात आले आहे. या दोघांवरही शहरातील नानल पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून या प्रकरणात आणखी कुणी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान जिल्ह्यात रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही त्याचा तुटवडा असताना जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटर मधील नर्सचं जर या इंजेक्शनचा काळा बाजार करत असेल तर रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा शल्य चिकित्सक नेमकं काय करताहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.