रायगड : प्लास्टिकचा कचरा हा जगासाठी चिंतेच विषय बनला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये प्लास्टिक बंदीही करण्यात आली आहे. प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. असाच एक प्रयोग रायगड जिल्ह्यात करण्यात आला आहे. रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीने रायगडमधल्या नागोठाण्यात 50 टन प्लास्टिक कचऱ्यापासून 40 किमी लांबीचा रस्ता बनवला आहे. रस्ता बनवण्यासाठी दुधाच्या पिशव्या, चॉकलेट, वेफर्सचे रॅपर आणि इतर खराब प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे हा रस्ता तयार होताना प्रत्येक किमी मागे एक लाख रुपयांची बचत झाली आहे.

दर पावसाळ्यात राज्यात रस्त्यांची दुर्दशा होते. ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पाहायला मिळतात. या खड्ड्यांमुळे अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. मात्र पावसातही या रस्त्याचं नुकसान होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यात या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

हा रस्ता नेमका कसा बनला?
- रस्त्यात बिटूमेन आणि दगडांचे तुकडे एकत्र केले जातात
- यात 7 टक्के प्लास्टिक आणि 93 टक्के बिटूमेन मिक्स केलं जातं
- एक किलोमीटर रोडसाठी एक टन प्लास्टिकचा वापर होतो
- रायगडच्या रोडमध्ये 50 टन प्लास्टिकचा वापर
- काँक्रिटच्या रस्त्यांच्या तुलनेत 40 लाख रुपयांची बचत होते.

हे प्लास्टिक वापरात कसं आणतात ?
- खाऊच्या पदार्थांपासून रस्ता
- दुधाच्या पिशव्या, बिस्किट, चॉकलेट रॅपर आणि इतर वस्तूंचा प्लास्टिक कचरा साफ केला जातो
- तो मशीनमध्ये बारीक केला जातो.
- त्यानंतर गरम भट्टीमध्ये बिटूमेन, दगड आणि इतर वस्तूंबरोबर प्लास्टिक एकत्र केलं जातं.
- प्लास्टिकचे दाणे डांबरी रस्ता तयार करताना खडी आणि डांबरासोबत उच्च तापमानात वितळवण्यात येतात
- यात अस्फाल्ट काँक्रिटचा थर तयार होतो, ज्याचा वेअरिंग कोट म्हणून रस्त्यावर वापर होतो.

अशाप्रकारे प्लास्टिकयुक्त डांबरी रस्ते तयार केले जातात. या प्लास्टिकयुत्त डांबरीकरणामुळे रस्त्यांची लवचिकता वाढते आणि रस्त्याला तडा जात नाही आणि भेगा पडत नाहीत. तसंच वरच्या थरामध्ये प्लास्टिकचा वापर केल्याने रस्त्यावर पडणारे पाणी रस्त्यात झिरपत नाही.