मुंबई : दिल्ली विधानसभेच्या रणधुमाळीत भाजपकडून पुन्हा राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार प्रवेश वर्मा या दोन नेत्यांच्या प्रक्षोक्षक वक्तव्यांची सध्या चर्चा सुरु आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतल्या शाहीनाबागमधील महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. आज त्यांच्या आंदोलनाला 40 पेक्षा अधिक दिवस झाले आहेत. त्यांचं म्हणणं ऐकणं तर दूरच पण उलट त्यांच्या आंदोलनाला बदनाम करुन हा मुद्दा दिल्लीतील निवडणूक प्रचारात वापरण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि घसरता जीडीपी हे मुख्य प्रश्न असताना भलत्याच विषयांवर निवडणुकीचा प्रचार फिरवला जाता आहे. याचविषयी एबीपी माझाच्या माझा विशेषमध्ये चर्चा करण्यात आली. या चर्चेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर, काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, आपचे नेते धनंजय शिंदे आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सहभागी झाले होते.


शाहिनबाग येथील आंदोलन देशविरोधी - अतुल भातखळकर


भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या विषयावर बोलताना म्हटलं की, शाहिनबाग येथे देशविरोधी आंदोलन सुरु आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे हे पडसाद आहेत. अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याचंही त्यांनी समर्थन केलं. अनुराग ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना तेथे उपस्थित लोकांनी दिलं आहे. शाहिनबागेतून जे सांगितलं जाईल ते सगळे मान्य करतात. लोकांना या ढोंगी सेक्युलरिझमचा वैताग आला आहे. काश्मीरमधून हिंदूंना विस्थापित करून एवढी वर्ष झाली, मात्र त्यावर काँग्रेस इतर सेक्युलरिस्ट काहीही बोलत नाहीत. याचाच देशातील लोकांना राग येत आहे, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं.


सध्या दिल्लीत जे सुरु आहे, त्यावर त्याचं चित्र निवडणुकीच्या निकालनंतर स्पष्ट होईल. भाजपचे नेते विकासकामांच्या मुद्द्यांवरून आपचे वाभाडे काढत आहेत. त्यामुळे आपकडून विकामकामांच्या मुद्द्यांवरून इतर मुद्द्यांवर लक्ष विचलित केलं जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या स्पर्धेत काँग्रेस कुठेच नाहीत. काँग्रेसला दोन-तीन जागागी या निवडणुकीत मिळणार नाही, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं.


सीएएविरोधात मुस्लीमांना भडकवण्याचं काम सुरुये - अतुल भातखळकर


भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी केलेलं वक्तव्य जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर केलं होतं. मात्र शाहिनबागेत देशविरोधी कृत्य केलं जात आहे. सीएएविरोधात मुस्लीमांना भडकवण्याचं काम त्याठिकाणी सुरु आहे. अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांनी केलेल्या वक्तव्यांचं कुणीही 100 टक्के समर्थन करावं असं नाही. मात्र गद्दारांना गोळी मारा यात काहीही चुकीचं नाही. लोकं आपली भावना व्यक्त करत होते. या घोषणेवरुन पराचा कावळा केला जात आहे, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला.


शाहीनबागेतील आंदोलन त्यांना संविधानाने दिलेला अधिकार- रत्नाकर महाजन


काँग्रेसच्या रत्नाकर महाजन यांनी याविषयी बोलताना म्हटलं की, आम्हीच फक्त देशभक्त आहोत, हे दाखवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सवयय आहे. आणि आमची देशभक्ती मान्य करत नाहीत ते देशद्रोही आहेत, असं ते मानतात. हा त्यांचा जन्मजात सिद्धांत आहे. शाहीनबागेत शांततेत आंदोलनं सुरु आहेत. तो देशाच्या संविधानाने त्यांना दिलेला अधिकार आहे. शाहीनबागेतील आंदोलन अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र दिल्ली निवडणुकीदरम्यान हा मुद्दा उकरुन काढला गेला आहे. मात्र या आंदोलकांना भेटण्यासाठी एकही सरकारचा प्रतिनिधी त्याठिकाणी गेला नाही. हे आंदोलन आम्ही आमच्या पद्धतीने मोडून काढू असा त्यांना (भाजप) ठाम विश्वास आहे. मतदान करताना बटन एवढ्या जोरात दाबा की त्याचा करंट शाहीनबागेत गेला पाहिजे या अमित शाह यांच्या वक्तव्यावरही रत्नाकर महाजन यांनी टीका केली.


गद्दारीमध्ये भेदभाव का करावा- रत्नाकर महाजन


शाहीनबागचं आंदोलन महिनाभरापूर्वी सुरु झालं आहे. तर दिल्लीची निवडणुकीचं वेळापत्रक आता जाहीर झालं. त्यामुळे दोघांचा संबंध लावण्याची गरज नाही. अनुराग ठाकूर ज्या सभेत बोलत होते, ती भाजपची सभा होती. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद होता, याचं समर्थन केलं जाणार नाही, असा टोला रत्नाकर महाजनांनी अतुल भातखळकर यांना लगावला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलन, निदर्शने होत आहेत. मग केवळ शाहीनबागेतील लोक गद्दार का? गद्दारीमध्ये भेदभाव का करावा, असा टोलाही रत्नाकर महाजनांनी भाजपला लगावला.


दिल्ली निवडणूक भाजप मानसिकदृष्ट्या हरलीय - धनंजय शिंदे


आपचे नेते धनंजय शिंदे यांनी म्हटलं की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे मुलभूत प्रश्न सोडवण्याचं काम केलं आहे. यामध्ये पाणी, वीज, आरोग्य, महिला सुरक्षा, शिक्षणसंबधीचं काम त्यांनी केलं आहे. दिल्लीतील कामांचं मॉडेल आज अनेक राज्य वापरण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे आपविरोधात बोलण्यासाठी विरोधी पक्षांकडे काहीही नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचारात विषयांतर केलं जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याठिकाणच्या सभा देखील कमी केल्या आहेत. मानसिकदृष्ट्या ही निवडणूक भाजप हरली आहे. त्यामुळेच त्यांच्या नेत्यांकडून अशी आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.


शाहीनबागेतील आंदोलन देशविरोधी आहे तर भाजप गप्प का? दिल्लीतील पोलीस खातं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येतं. त्यांनी काही योग्य भूमिका घेणे आवश्यक होतं. जर परिस्थिती नियंत्रणांबाहेर जात असेल तर गृहमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. अमित शाह यांना शाहीनबागेतील सोडवू शकलेले नाहीत. गृहमंत्री नात्याने अमित शाह नापास झाले आहेस, असा धनंजय शिंदे यांनी म्हटलं. आम्ही महात्मा गांधींना मानतो. त्यांच्या अहिंसेच्या मार्गावर आम्ही चालतो. बंदुकीच्या गोळीने कोणतेही प्रश्न सोडवले जाऊ शकत नाही. भाजपच्या नेत्यांनी हिटलरचा इतिहास वाचावा, त्यामुळे गोळ्या चालवल्याने काय होतं याची जाणीव त्यांना होईल, अशी टीका धनंजय शिंदे यांनी केली.


राजकीय विश्लेशक अभय देशपांडे यांनी म्हटलं की, अलिकडच्या काळात पार पडलेल्या निवडणुकीत भाजप विरुद्ध पाकिस्तान अशाच पार पडत आहेत. पाकिस्तान हा मुद्दा निवडणुकीच्या काळात येणं नवीन नाही. मात्र हात प्रचार जुते मारो वरुन गोली मारोपर्यंत पोहोचला आहे. मात्र आता हे गद्दार देशातील भाजपला विरोध करणारे आहेत की, भारताला विरोध करणारे आहेत, याची व्याख्या प्रत्येकजण आपल्याला वाटेल तशी करतो. मात्र आताच्या अनेक निवडणुका विकासाच्या मुद्दावर न होता भलत्याच विषयांवर लढवल्या जात आहेत. सीएए आणि एनआरसीमुळे याची धार वाढली आहे.