सातारा : मराठा आरक्षण संदर्भात शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. ऑक्टोबर महिन्यात पुण्यात होणाऱ्या विचार मंथन बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी विनायक मेटे आज साताऱ्यात आले होते. या वेळी मराठा समाजाच्या प्रश्नांवर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या बरोबर विनायक मेटे यांनी सविस्तर चर्चा केली. मराठा आरक्षणाच्या लढाईचं नेतृत्व कोणी करावं? संभाजीराजे की उदयनराजे या दृष्टीनेही आजची भेट महत्वाची मानली जात आहे.
या भेटीनंतर बोलत असताना विनायक मेटे म्हणाले मराठा आरक्षणाबाबत समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी आज मी शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. त्या दोघांनाही मराठा विचारमंथन बैठकीचे निमंत्रण दिले. दोघेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठा समाजाला या बैठकीत दिशा देण्याचे काम त्यांनी करावे असे आवाहन केल्यानंतर दोघांनीही या बाबत संमती दर्शवल्याचे यावेळी विनायक मेटे यांनी सांगितले.
मराठा समाजातील आमदार सोशल मीडियावर होतायेत ट्रोल? कारण..
या भेटीबाबत बोलत असताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, की मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणून संघटित लढा देण्याचे काम येत्या 3 ऑक्टोबरला पुण्यामधील बैठकीत होणार आहे. या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार असून जो निर्णय समाज घेईल त्या निर्णयाबरोबर मी असेन.
नेतृत्व कुणी करावे हे महत्वाचे नाही तर.. : खासदार उदयनराजे
तर उदयनराजे म्हणाले, मराठा समाजाने कधीही कुणाचे आरक्षण मागितले नसून स्वतः च्या हक्काच्या आरक्षणाची मागणी केली आहे. 3 तारखेला होणाऱ्या बैठकीसाठी मी स्वतः उपस्थित राहणार आहे. नेतृत्व कुणी करावे हे महत्वाचे नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे महत्वाचे आहे. या प्रश्नांची दखल कुणी घेतली नाही तर उद्रेक होईल. याला जबाबदार कोण? असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.
Maratha Andolan | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील घरासमोर मराठा आंदोलन