मुंबई : कोरोनाचा कहर वाढतोय, आकडे वाढत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आपल्याला संसर्ग होवू नये म्हणून लोकं वेगवेगळ्या पद्धतीने आपली काळजी घेत आहेत. कोरोनावर औषध आणि लस शोधण्यात जगभरात प्रयत्न सुरु आहेत. मात्र कोरोनापासून वाचण्यासाठी करण्यात येणारी देशी जुगाडं देखील कमी नाहीत. आयुर्वेदिक काढा घेतल्याने कोरोना होत नाही, अशी नागरिकांची समजूत आहे. मात्र या काढ्याचे दुष्परिणाम देखील नंतर समोर आले. आता वाफ घेतल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढत असल्याचा दावा सोशल माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे वाफ घेण्याच्या मशीनची अचानक मागणी वाढली आहे.


या वाफेसंदर्भातला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. स्टोव्ह, प्रेशर कुकर आणि काही पाईप्स वापरुन एका व्यक्तिने एक वाफ घेण्याचं मशीन बनवलं आहे. या मशीनद्वारे काही लोक वाफ घेत असल्याचं दिसून येत आहे. काही यूझर्सनी हा व्हिडीओ पुण्याचा असल्याचा दावा केला आहे तर काहींनी अहमदाबादचा. या देशी जुगाडातून बनलेल्या मशीनमधून वाफ घेण्यासाठी 5 मिनिटांसाठी दहा रुपये आकारले जात असल्याचा दावा देखील केला जात आहे.





कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग करत आहेत. प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घेण्यापासून श्वासोच्छवासाच्या व्यायाम करणे असे अनेक प्रयोग होत आहेत. यात आता स्टीम म्हणजे वाफ घेण्याचे प्रयोग वाढले आहेत. याबाबत तज्ञ डॉक्टर्स काय म्हणतात हे आपण जाणून घेऊ...


सुरक्षित वाफ घेणं उत्तम- डॉ. श्रीनिवास चव्हाण
याबाबत जेजे रुग्णालयाचे कान, नाक, घसा तज्ञ डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितलं की, वाफ घेतल्याने 60 डिग्री सेल्सिअसमध्ये व्हायरस कमजोर होतो. आजच्या कोरोना काळात स्टीम घेणे गरजेचे आहे. स्टीम घेतल्याने नाक मोकळं होतं, श्वासोच्छास प्रक्रिया सुलभ होते. नाकात व्हायरस असेल तर तो नष्ट होण्यास मदत होते, असं डॉ. चव्हाण यांनी सांगितलं. डॉ. चव्हाण म्हणाले की, दिवसातून एकदा तरी वाफ घ्यावी. कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांनी घरी आल्यावर तर नक्की वाफ घ्यावी, तसेच सर्दीचा त्रास असलेल्या लोकांनी या काळात दोनदा तरी स्टीम घ्यावं, असं ते म्हणाले. फक्त हे स्टीम घेताना पाणी मात्र बदलावं, असं डॉ. चव्हाण म्हणाले.


अशा पद्धतीनं वाफ घेणं चुकीचं- डॉ. रेवत कानिंदे
यासंदर्भात जे जे रुग्णायातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवत कानिंदे म्हणाले, मी तो व्हिडीओ पाहिला. त्यात लोकं सामूहिकरित्या वाफ घेत आहेत. अशा पद्धतीनं वाफ घेणं अत्यंत चुकीचं आहे. आपण जी दवाखान्यात वाफ घेतो ती स्टराईल वॉटरची वाफ असते. त्यात काही वेळा प्लेन वाफ देतात किंवा काही वेळा काही मेडिसिन टाकलेले असतात. डॉ. कानिंदे म्हणाले, वाफ घेण्याचा मुख्य उद्देश्य फुफ्फुसाच्या नलिका प्रसरण पावून त्यात अडकलेला कफ बाहेर यावा हा असतो. अशा ठिकाणी वाफ घेताना पाणी अशुद्ध असते. अशा ठिकाणी वाफ घेतल्याने पाण्यात असलेले व्हायरस किंवा बॅक्टेरिया थेट तुमच्या शरीरात जाऊ शकतात. त्यामुळं दवाखान्यात किंवा घरी चांगल्या पाण्यानं वाफ घेणं हेच चांगलं आहे, असं डॉ. कानिंदे म्हणाले.


रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'हे' करा
डॉ. कानिंदे यांनी सांगितलं की, कोरोना काळात लोकं ऐकिव किंवा व्हॉट्सअॅपवर आलेल्या फॉरवर्ड पोस्टवरुन काहीही उपाय करत बसतात. कोरोनासाठी आजपर्यंत कुठलीही निश्चित उपाय मिळालेला नाही. दवाखान्यात दिले जाणारे वेगवेगळे उपाय हेच सध्या उपायकारक आहेत. वाफ किंवा काढे घेतल्याने 'फॉल्स सेक्युरीटी' मिळते. त्यामुळं माणूस मास्क न वापरणं, सोशल डिस्टंसिंग न करणे अशा चुका करतो. त्यामुळं कोरोना होण्याची भीती वाढते, असं डॉ. कानिंदे म्हणाले. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज सात ते आठ तास झोप, दररोज पौष्टिक आहार, तणावमुक्त जीवनशैली हा उपाय असल्याचे डॉ. कानिंदे यांनी सांगितलं.