मुंबई : मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या आणि अनेक नेतेमंडळींकडून अधोरेखित केल्या गेलेल्या राज्यातील नोकरभरती प्रक्रियेला अखेर राज्यात सुरुवात झाली आहे. शनिवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच महाविकासआघाडी सरकारनं राज्यात टप्प्याटप्प्यानं नोकरभरती प्रक्रियेस सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. ज्यानंतर आता अखेर ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.


राज्यातील या महाभरती प्रक्रियेअंतर्गत गृहविभागात 5 हजारहून अधिक जागांसाठी भरती होणार आहे. तर, या प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्यात 7 हजारहून अधिक पदांसाठी भरती होणार आहे. भरती प्रक्रियेअंतर्गत गृहविभागात 5 हजार 297 पदांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 231 पदांसाठी भरती होणार आहे. आरोग्य विभाग आणि गृह विभाग अशी तब्बल 13 हजार 800 पदांची पहिल्या टप्प्यांत भरती होणार आहे.


एकिकडे भरतीसाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरीही मराठा नेते मात्र तूर्तास नोकरभरती होऊ नये यासाठी आग्रही आहेत. त्यामुळं राजकीय तेढही येथे निर्माण केली जाऊ शकते. नोकरभरतीचा हा प्रश्न प्रतिक्षेत ठेवत मराठा समाज आणि इतर समाजातील पात्र उमेदवारांवर किती अन्याय करायचा याबाबत मंत्रीमंडळात चर्चा झाली आणि अखेर राज्याकील लाखो बेरोजगारांना दिलासा देणारा हा निर्णय घेण्यात आला.


28 फेब्रुवारीला आरोग्य विभागाची भरती राज्यात एकाच वेळी होणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी यावेळी नव्यानं अर्ज करायला नाही आहे. मराठा समाजाच्या प्रवर्गातून अर्ज केलेल्या अर्जदारांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून नव्यानं प्रमाणपत्र घेऊन पुन्हा ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.





विनायक मेटेंनी व्यक्त केली नाराजी...


''मागील काही दिवसांपासून सातत्यानं हा प्रश्न मांडला जात आहे. इथं दुर्दैवाचा भाग असा की, नोकरभरती सध्या पुढ ढकला असं सांगूनही शासन त्यासाठी तयारी दाखवत नाही. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विरोधात जाण्याची भूमिका या साऱ्यांनीच घेतली आहे. याचा अर्थ एकच आहे की सरकारमधील हे मंत्री मराठा असले तरीही त्यांना सत्तेची धुंदी आली आहे. योग्य- अयोग्य काय याचा निर्णय त्यांना घेता येत नाही. याचे परिणाम मात्र यांना भोगावे लागतील.


मी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी या प्रक्रियेत लक्ष घालत भरती प्रक्रिया पुढे ढकलत सर्वांसमवेत मराठा समाजालाही न्याय द्या अशी मागणी केली. असं न झाल्यास यांच्याविरोधात जाण्यावाचून आमच्याक़डे काही पर्याय नाही. भरती प्रक्रिया रद्द केली नाही, तर त्यावर काय भूमिका घ्यायची याचा विचार आम्ही करत आहोत'', अशी नाराजीची प्रतिक्रिया मेटेंनी दिली.