Eknath Shinde : महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारनं (Maharashtra Government) भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सत्तेत येताच मागील सरकार अर्थात महाविकास आघाडी सरकारने (MVA Government) घेतलेल्या निर्णयांना एकामागून एक धक्के देण्यास सुरुवात केली. सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट मीटिंगमधील सर्व निर्णय रद्द करण्यापासून ते मोठ-मोठे निर्णय स्थगित करण्यात सुरुवात केली. पण आता मोठ्या प्रमाणात या सर्वावर टीका झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत स्थगित निर्णयासंबधी पुन्हा विचार करणार असल्याची माहिती दिली. स्थगितीची प्रकरणे वाढली तर कोर्ट केसेस ही मोठ्या प्रमाणावर वाढतील असं अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देताच शिंदेनी ही भूमिका घेतली आहे. आता लवकरच स्थगिती दिलेल्या कामांचा मुख्य सचिव पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेणार आहेत.
विभागीय सचिवांच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही सूचना दिल्या असून लोकांचे प्रश्न सोडवतांना सकारात्मकता ठेवा, राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्याच्या योजना गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा असेही निर्देश दिले.
आवश्यक कामांना स्थगिती नाही
स्थगित निर्णयांनंतर सरकारवर होणाऱ्या टीकांबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी 'मागील सरकारने शेवटी शेवटी घाईघाईत, घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. जनतेशी संबंधित आवश्यक अशा कामांना स्थगिती नाही' असे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव हे देखील उपस्थित होते.
हे देखील वाचा-