मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याचं म्हटलं जात असतानाच आता हा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात नेत्यांना प्राधान्य मिळत असल्याने दोन्ही पक्षांत अंतर्गत कलह सुरु झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भाजप-शिवसेनेत मंत्रिपदाचे दावेदार, विभागांचं वाटप आणि शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद निश्चित होत नाही तोपर्यंत विस्तारावर निर्णय होणार नाही.

विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा देत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याची अपेक्षा आहे. पण भाजप त्यांना कृषी खातं देण्यावर आग्रही आहे. तर मोहिते पाटलांना कुठलं खातं द्यायचं यावर अजूनही खल सुरु आहे.

इतकंच नाही, तर मंत्रिमंडळात दोन नंबरचे मंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यपद देण्याबाबत भाजपमध्ये विचार सुरु आहे. पण महत्त्वाची खाती सोडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक जबाबदारी स्वीकारण्यास पाटील अनुकूल नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

VIDEO | आदित्य ठाकरेंनी विधानसभा लढवावी का? युवासेना पदाधिकाऱ्यांना काय वाटतं?



एकट्या भाजपमध्येच नाही, तर शिवसेनेतही अंतर्गत कलह सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची अटकळ बांधली जात आहे. यासाठी विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाईंचं नाव शर्यतीत आघाडीवर आहे. यावरुन नाराज असलेल्या आमदारांच्या एका गटाने एकनाथ शिंदेंसाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरु केल्याचं दिसत आहे.

इतकंच नाही, तर ग्रामीण भागात लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दाराने आलेल्या विधानपरिषद सदस्यांना स्थान देण्यात येत असल्याने शिवसेना आमदारांमध्ये असंतोष असल्याचं बोललं जात आहे.