सातारा : नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी 14 वर्ष पाणी बारामतीला पळवलं. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, असा गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे असंही उदयनराजेंनी म्हटलं. 1954 च्या पाणीवाटप करारानुसार नीरेच्या डाव्या कालव्यातून बारामतीला 43 टक्के तर उजव्या कालव्यातून सांगोला, फलटण, माळशिरस आणि पंढरपूरसाठी 57 टक्के पाणी देण्याचा निर्णय झाला होता. 2009 मध्ये अजित पवारांनी यात बदल करत बारामतीला पाण्याचा मोठा टक्का देऊ केला. मात्र, आता सरकारने पुन्हा एकदा 1954 च्या पाणीवाटपानुसार पाणी वाटप करण्याचा अध्यादेश जारी केला.
आता पुन्हा एकदा 1954च्या कायद्यानुसार हे पाणीवाटप करण्याचा मोठा निर्णय भाजप सरकारने घेतला. बारामतीला वळवलेले दुष्काळी भागाच्या हक्काचे पाणी पुन्हा एकदा या भागाला मिळणार असल्याने या भागातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून त्यांची तहान भागणार आहे.
आणखी वाचा