Rayat Shikshan Sanstha : रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची आणि मोठी शिक्षण संस्था आहे. कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांनी बहुजन समाजातील, गोर गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं, या हेतूनं रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. आजचा दिवस रयत शिक्षण संस्थेच्या दृष्टीनं खूप महत्वाचा दिवस आहे. कारण आज रयतचा स्थापना दिवस आहे. 4 ऑक्टोबर 1919 ला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा (Satara) जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले (Kale) इथं रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली.


कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काले या गावी सत्यशोधक समाजाच्या मेळाव्यामध्ये बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी 'रयत शिक्षण संस्था' या नावाने एक शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात यावी असा ठराव मांडला होता. तो एकमतानं मंजूर झाला. त्यानंतर 4 ऑक्टोबर 1919 रोजी विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. स्वतःच्या मालकीची जमीन करणाऱ्या शेतकऱ्यास 'रयत' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेला 'रयत' म्हणून संबोधित करत. त्यामुळं ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेला 'रयत शिक्षण संस्था' हे नाव देण्यात आलं.


शाळेविना एकही खेडं असू नये अशी कर्मवीरांची विचारसरणी


शाळेविना एकही खेडं असू नये आणि प्रशिक्षित शिक्षकाविना एकही शाळा असू नये अशी कर्मवीर भाऊराव पाटील यांची विचारसरणी होती. सातारा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्याची पूर्वतयारी म्हणून त्यांना योग्य असे शिक्षक घडवणं आवश्यक होतं. 1921 मध्ये सातारा जिल्ह्यातील अंगापूर इथं भरलेल्या बहुजन समाजाच्या प्राथमिक शिक्षकांच्या परिषदेत भाऊरावांनी सातारा येथे ट्रेनिंग कॉलेज सुरु करणार असल्याची घोषणा केली. या आश्वासनांची पूर्तता सन 1935 साली झाली. त्या वर्षी रयत शिक्षण संस्था रजिस्टर केली. वटवृक्ष हे संस्थेचे बोधचिन्ह बनवण्यात आलं. सातारा येथे 'सिल्व्हर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज' या नावाने एक ट्रेनिंग कॉलेज भाऊरावांनी 1935 मध्ये सुरु केले. तेच आजचे महात्मा फुले अध्यापक विद्यालय होय. एतद्देशीय खासगी शिक्षण संस्थेने सुरु केलेले हे राज्यातील पहिले ट्रेनिंग कॉलेज होते. स्त्री-शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी सन 1942 मध्ये सातारा येथे 'जिजामाता अध्यापिका विद्यालय' सुरु केले. 


महात्मा गांधी यांनी केलं होतं कौतुक


1924 साली रयत शिक्षण संस्थेचं काले येथून सातारा शहरात स्थलांतर करण्यात आलं. याठिकाणी सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एक मिश्र वसतीगृह सुरू करण्यात आलं. 1927 मध्ये या वसतीगृहाचं महात्मा गांधी यांच्या हस्ते 'श्री छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग हाऊस' असं नामकरण करण्यात आलं होतं. याठिकाणी सर्व जातीधर्माची मुले एकत्र जेवतात, काम करून एकत्रित शिक्षण घेतात हे पाहून गांधीजींनी त्यांचं कौतुक केलं होते. गांधीजींच्या हरिजन-सेवक संघाकडून या वसतीगृहाला 1933 पासून वार्षिक 500 रुपये इतकी मदत देण्यात येत होती.



1947 साली सातारा येथे भाऊरावांनी 'छत्रपती शिवाजी कॉलेज' ची स्थापना


सन 1947 साली सातारा येथे भाऊरावांनी 'छत्रपती शिवाजी कॉलेज' उघडले. हे कॉलेजही मोफत व निवासी होते. गरीब विद्यार्थी स्वावलंबनाने उच्च शिक्षण घेऊ लागले. 'कमवा व शिका' योजना रुजू लागली. सन 1954 मध्ये कराड तालुक्यातील सैदापूर इथे 'सदगुरु गाडगे महाराज कॉलेज' उघडून भाऊरावांनी उच्च शिक्षण ग्रामीण भागात नेले. सन 1955 मध्ये सातारा येथे त्यांनी पदवीधर शिक्षकांच्यासाठी एक प्रशिक्षण महाविद्यालय उघडले. 'आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन' असे याचे नंतर नामकरण झाले. 


रयत शिक्षण संस्थेची 42 महाविद्यालये आणि 439 हायस्कुल


रयत शिक्षण संस्थेचं महाराष्ट्रभर जाळं पसरलं आहे. रयत शिक्षण संस्थेची 41 महाविद्यालये आहेत. तर 439 हायस्कुल आहेत. कॉलेजच्या मुलांसाठी 27 वसतीगृहे, 160 उच्च माध्यमिक विद्यालये, 17 शेती महाविद्यालये, 5 तंत्र विद्यालये, 5 इंग्रजी माध्यमाच्या शाळा, 8 डी.एड. महाविद्यालये, 45 प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा, शाळेल्या मुलांसाठी 68 वसतिगृहे, 8 आश्रमशाळा, 58 आयटीआय व इतर अशा एकूण संस्था 679 संस्था आहेत. या रयत शिक्षण संस्थेत  साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रयत शिक्षण संस्थेबद्दल इवलेसे रोप लावियेलें द्वारी, त्याचा वेलू गेला गगणावरी हा अभंग तंतोतंत लागू होतो. कारम आज रयतचा मोठा वृटवृक्ष झाला आहे.



रयत शिक्षण संस्थेची उद्दिष्टं  


बहुजन समाजामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि ती वाढवणं
मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणं
निरनिराळ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणं
एकीचे महत्त्व कृतीनं पटवून देणं
सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणं
कमवा आणि शिका योजनेतून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणं


महत्त्वाच्या बातम्या: