कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोजमध्ये एका सधन आणि सुशिक्षित जैन कुटुंबात जन्मलेले अण्णा शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याने प्रभावित होत अण्णांची सामाजिक जाणीव अगदी विद्यार्थीदशेतच प्रगल्भ झाली. महात्मा फुलेंच्या विचारांनी अण्णा सत्यशोधक समाजात आले आणि महात्मा गांधींच्या आचारांना पाहत त्यांच्यासारखी साधी राहणी आयुष्यभरासाठी त्यांनी स्विकारली. किर्लोस्कर कंपनीसाठी लोखंडी नांगर विकता विकता 1919 साली "रयत शिक्षण संस्था" अण्णांनी सुरू केली आणि त्यानंतर अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त गोरगरीब आणि बहुजन समाजाच्या शिक्षणाचाच वसा वाहिला. महाराष्ट्र आज देशात सर्वात प्रगत राज्य असण्याचे खूप मोठे श्रेय महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर, संत गाडगेबाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना जाते ज्यांनी इथे समतेची, सर्वदूर शिक्षणाची आणि पुरोगामी विचारांची मुहूर्तमेढ रोवली.


अण्णांनी स्वतःच्या संस्थेला "रयत" हे नाव खूप विचार करून दिले होते, जे छत्रपती शिवाजींच्या "रयतेचे राज्य" या संकल्पनेतून आले होते. संस्थेचे बोधचिन्ह म्हणून वडाचे झाड निवडले गेले तेही तसेच विचार करून. जशी वडाची प्रत्येक पारंबी एक नवीन झाड जन्माला घालत मूळ वृक्ष विस्तीर्ण होत जातो, तशी रयत शिक्षण संस्था प्रत्येक शाळा, कॉलेज आणि होस्टेलबरोबर स्वतःला विस्तारत गेली. सुरुवातीच्या काळात अण्णा खेडोपाडी भटकून शाळेत जाण्यासाठी मुले गोळा करून आणायचे. स्वर्गीय बॅ. पी. जी. पाटील सरांसारखी कित्येक ग्रामीण, गरीब, बहुजन मुले अण्णांनी खांद्यावर बसवून स्वतःच्या वसतिगृहात भरती केली आणि शिकवली. स्वतःची सगळी संपत्ती अण्णांनी या शिक्षणाच्या यज्ञात स्वाहा केली. एके दिवशी बोर्डिंगमधल्या मुलांना जेवणाची अडचण आली तर अण्णांनी स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातले मंगळसूत्रसुद्धा विकायला क्षणभर विचार केला नाही.


"महाराष्ट्रातील शेवटचं मूल शाळेत जात नाही तोवर मी पायात जोडे घालणार नाही" हे कर्मवीर अण्णांचे वचन होते आणि त्यानुसार ते आयुष्यभर अनवाणी राहिले. एवढा सगळा त्याग या महामानवाने आणि त्यांच्या पत्नीने केला तो फक्त गोरगरीबांची मुले शिकावी म्हणून, कारण शिक्षण हे सामाजिक सुधारणेचे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे हे अण्णांनी आजपासून शंभर वर्षे आधी ओळखले होते. गरीब-बहुजन मुलांच्या शिक्षणासाठी अण्णांनी झोळी पसरायला कधीही लाज बाळगली नाही, आणि या उदात्त कार्याच्या आडवे येणाऱ्या लोकांना धडा शिकवायलाही अण्णा कधी कचरले नाहीत, कारण शेवटी शाहू महाराजांच्या तालमीतला पैलवान होते ते! शिक्षणाचा खर्चही स्वतःच्या श्रमातून करावा हा अण्णांचा दंडक होता, म्हणून रयतचे घोषवाक्य ठरले "स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद".


रयतच्या प्रत्येक वसतिगृहात आणि शाळा-कॉलेजात श्रमाला प्रतिष्ठा आहे. "कमवा आणि शिका" या योजनेचा तेथे पुरस्कार आहे. माझे वडील स्वतः हायस्कूलपासून ते MA पूर्ण होईपर्यंत अण्णांच्या बोर्डिंगमध्ये राहून स्वतःच्या कष्टाने शिकले, कारण आळस करण्याला तिथे सोयच नव्हती. माझे वडील जेव्हा प्राध्यापक म्हणून रयत शिक्षण संस्थेत पंढरपूरला रुजू झाले तेव्हा सुरुवातीच्या काळातच कॉलेजच्या हॉस्टेलचा अतिरिक्त प्रभार त्यांच्याकडे आला. रेक्टरच्या क्वार्टरमध्ये माझ्या वयाच्या तिसऱ्या वर्षी आम्ही सहकुटुंब राहायला गेलो आणि पुढची दहा वर्षे तिथेच राहिलो. माझ्या वैयक्तीक आयुष्यात या दहा वर्षांनी मला सगळ्यात जास्त घडवलं कारण कुणी शेजारपाजार नसल्याने पंढरपूरच्या कर्मठ वातावरणाचा स्पर्श आम्हा भावंडाना लहानपणी झाला नाही. गरिबी हा एकमेव समान धागा असणाऱ्या अठरापगड जातीच्या 60-70 मुलांमध्ये आम्ही लहानाचे मोठा झालो, त्यांच्याचसोबत रोज हॉस्टेलच्या खानावळीत जेवलो. जात-धर्म यांची घाण मेंदूला कधी चिकटलीच नाही.


आमच्या पंढरपूरच्या हॉस्टेलमधला प्रत्येक रहिवासी विद्यार्थी आमचा मामा होता, कारण सगळे माझ्या आईला ताई म्हणायचे. माझ्या सख्ख्या मामा लोकांपेक्षा माझे हे असंख्य मानलेले मामा मला आजही जास्त जवळचे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याची आयुष्यकथा एखाद्या सिनेमाला किंवा कादंबरीला लाजवेल इतकी रंगीत होती. होस्टेल उन्हाळ्याच्या सुट्टीत बंद असायचं तेव्हा काही मुले काम करण्यासाठी घरी न जाता पंढरपूरला राहायची. कुणी पाव विकायचं, कुणी हातगाडीवर काकडी विकायचं, कुणी पेपर टाकायचं, तर कुणी भाड्याच्या सायकलवर बर्फाची लादी बांधून गारेगार विकायचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत खानावळ बंद असायची तेव्हा ST ने पोरांचे घरून डबे यायचे, ज्यात मीही घरचे ताट एक्स्चेंज करून जेवायचो. एक अनाथ मुलगा होता, ज्याला ख्रिस्ती मिशनरीनी सांभाळले होते, त्याला डबा यायचा नाही म्हणून पांडुरंगाच्या देवळात पहाटे काकडआरती करायला जाऊन तिथल्या प्रसादावर तो दिवस काढायचा. जेव्हा हे वडिलांना कळलं तेव्हा त्याला रोज आमच्या घरून जेवण दिलं जायचं. पोटाची भुक हा जगातला एकमेव धर्म आहे हे तेव्हा कळलं.


दहा वर्षात आणि पूढची कित्येक वर्षे यातली कित्येक गरिबाघरची मुले शिक्षक, प्राध्यापक, पोलीस, सरकारी नोकरी वगैरेत गेली. कित्येक घरे कर्मवीर अण्णांनी बांधलेल्या त्या वसतिगृहामुळे आणि कॉलेजमुळे गरिबीतून बाहेर पडत होती. अल्पकालीन रक्तरंजित क्रांतीपेक्षा कर्मवीर अण्णांची अहिंसक शैक्षणिक क्रांती अण्णांच्या माघारीही या समाजात दीर्घकाळ सुधारणा करत होती. शेणातून धान्य वेचून खावं इतक्या गरीब घरातून आलेले माझे वडील कर्मवीर अण्णांच्या कृपेने शिकून प्राध्यापक बनून उपप्राचार्याच्या पदावर पोचून निवृत्त झाले. मी स्वतः डॉक्टर झालो, आणि पुढे IIM Ahmedabad सारख्या देशातल्या सर्वोत्तम संस्थेत व्यवस्थापन शिकलो. माझी धाकटी बहीण वकील झाली, आणि National Law School या वकिलाच्या सर्वोत्तम शिक्षणसंस्थेतून मास्टर्स झाली. वटवृक्ष कर्मवीर अण्णांच्या पारंब्या आजही विस्तारत आहेत, एका अविरत विधायक सामाजिक क्रांतीसाठी!


डॉ. विनय काटे यांचे अन्य काही ब्लॉग 


BLOG | मुंबईला आणि महाराष्ट्राला पर्याय येईल?


BLOG | आमच्या देशात रॉकस्टार का निर्माण होत नाहीत?


BLOG | दिल्लीचा Serological Survey काय सांगतो?


भारतीय जनतेचं संज्ञान असंतुलन - 'मोदी व गांधी'