बुलढाणा : कोरोनाच्या या संकटामध्ये औषधोपचारापासून अगदी ऑक्सिजन मिळवण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची वणवण सुरु असल्याचं विदारक चित्र सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पाहायला मिळत आहे. परिस्थिती रुळावर येण्याकडेच सर्वजण आस लावून बसलेले असताना संकटं काही केल्या कमी होत असल्याचं नावही घेत नाही आहे. त्यातच अनेकदा प्रशासनावर संतापही व्यक्त केला जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशीच काहीशी घटना बुलढाण्यात घडली. 


एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेची कोविडमुळे प्रकृती अत्यवस्थ झाली. ग्रामीण भागातून आलेल्या महिलेस शहरातील शासकीय स्त्री रुग्णालयात जागा नसल्याने भरती करवून घेण्यात आले नाही. आईचे प्राण वाचावेत म्हणून मुला, मुलीने खासगी दवाखान्यांच्या डॉक्टरांकडे विनवणी केली. मात्र, सर्व रुग्णालये रुग्णांनी भरलेली, त्यातच ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने तेथेही त्यांना नाकारण्यात आले. 


तब्बल पाच तास फिरूनही औषधोपचाराची सोय होत नसल्याने आईला गमावण्याची वेळ मुलांवर येऊन ठेपली. दरम्यान, या गंभीर बाबीची माहिती समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रुग्णवाहिका थेट जिल्हाधिकारी कार्यालय आणि  जिल्हाधिकारी कक्षासमोर नेऊन आपला रुद्रावतार दाखवला. 


ग्लोबल रुग्णालयात उपचारासाठी दीड लाख घेणाऱ्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल 


रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार थांबवा, असा इशारा देताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने महिलेला स्त्री रुग्णालयामध्ये भरती करवून घेतले. रविकांत तुपकरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे बेड आणि ऑक्सिजन मिळाल्याने अखेरच्या घटका मोजत असलेल्या 'त्या' महिलेचे प्राण वाचले.