Maharashtra Politics अमरावती : अमरावती जिल्ह्यात पुन्हा आमदार रवी राणा(Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)यांच्यात वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण प्रहारचे आमदार राजकुमार पटेल (Rajkumar Patel) यांना शिवसेना शिंदे (CM Eknath Shinde) गटात बच्चू कडू यांनीच पाठवलंय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात साठ गाठ आहे. बच्चू कडू यांचीच ही खेळी आहे. असा खळबळजनक गौप्यस्फोट आमदार रवी राणा यांनी केलाय. तर मेळघाटमध्ये शिंदे सेनेने राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात युवा स्वाभिमान पार्टीचा उमेदवार उभं करू आणि त्याला निवडून आणू, असा इशाराही आमदार रवी राणा यांनी दिलाय. त्यामुळे रवी राणा हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.


मेळघाटमध्ये एकतर कमळ पाहीजे, नाहीतर युवा स्वाभिमान पक्ष


महायुतीचं पालन बच्चू कडू यांनी केलं नाही. त्यामुळे संपूर्ण मेळघाटची मागणी आहे की, मेळघाटमध्ये एकतर कमळ पाहीजे, नाहीतर युवा स्वाभिमान पक्ष पाहिजे. दर्यापूर मतदारसंघात देखील अजून कोणाला जाईल हे निश्चित झालं नाही. जेव्हा होईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ. युवा स्वाभिमान पार्टीने मेळघाट आणि दर्यापूरची जागा मागितली आहे. तर अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात भूमिका घेतली असली तरी महायुतीने अजून उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे या मतदारसंघावर एकप्रकारे दावा करत आमदार रवी राणांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


आम्हाला बाहेरचे पार्सल अजिबात चालणार नाही- नवनीत राणा 


दर्यापूर मतदारसंघात आम्हाला बाहेरचे पार्सल अजिबात चालणार नाही. या मतदारसंघात केवळ कमळचाच उमेदवार निवडून येईल आणि तो अमरावती जिल्ह्याचाच राहील, असा टोला नवनीत राणा यांनी अभिजित अडसूळ यांना लगावला. सोमवारी शिवसेना शिंदे गटाचा मेळावा दर्यापूर मध्ये पार पडला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. दरम्यान अभिजित अडसूळ यांनी दर्यापूरसाठी दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना नवनीत राणा यांनी अभिजित अडसूळ यांचे नाव न घेता हा टोला लगावला आहे. लोकसभेत नवनीत राणा यांचा प्रचार अडसूळ पिता-पुत्रांनी केला नाही, असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता विधानसभेत दर्यापूर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत चांगलंच रान उठणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


हे ही वाचा