रत्नागिरी : देशात किंवा राज्यात अनेक गावं, ठिकाणं, परिसर असे आहेत ज्यांचा इतिहास हा समुद्ध आणि शुरांचा आहे. प्रत्येक जण तो आवडीनं आणि अभिमानानं सांगत असतो. पण, काही वेळेला त्याला पुरावे असतातच असं नाही. त्यावरून देखील काही मतमतांतरे दिसून येतात. पण, तुमचं गाव, ठिकाण किंवा परिसर यापैकीच एक असेल तर त्याठिकाणी असलेले वीरगळ हा काळाच्या ओघात गायब झालेला, हरवलेला इतिहास उलगडण्यास, पुढे आणण्यास मदत करतील. काहींना हे वीरगळ ठाऊक असतील, काहींनी ते पाहिले असतील किंवा काहींना याबद्दल काहीच माहिती देखील नसेल. असो. यावर जास्त चर्चा न करता आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात वीरगळ म्हणजे काय? ते असतात कुठं? ते कसे ओळखायचे आणि यांच्या मदतीनं काळाच्या ओघात हरवलेला इतिहास नेमका कसा उलगडला जाऊ शकतो?


वीरगळ म्हणजे काय


मुळात वीरगळ हे इतिहासाचे मुक साक्षीदार आहेत. युद्धभूमीवर वीरमरण येणे पुण्यप्रद मानले जाते. कोणत्याही युद्धात वीरगती प्राप्त झाल्यास त्या वीराचे स्मारक वीरगळांच्या रूपात उभारले जाते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, 'युद्धात शहिद झालेल्या, वीरगती प्राप्त झालेल्या वीराचे स्मरण करण्यासाठी पाषाणावर काही विशिष्ट केलेले शिल्पांकन किंवा दगडावर केलेले कोरीव काम म्हणजे वीरगळ. अशा या शुरवीराचे, लाडक्या योद्ध्याचे स्मारक असलेले हे वीरगळ गावोगावी पाहायाला मिळतात. पण, जनमानसात याची माहिती फारच मोजक्यांना आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. गावच्या किंवा परिसरातील पुरातन अशा मंदिराच्या आवारात हे वीरगळ दिसून येतात. त्यामुळे काही ठिकाणी याची पुजा देखील केली जाते. शिवाय, अनेकांचे हात देखील या वीरगळांसमोर देव म्हणून आपसूक जोडले जातात.



वीरगळ ओळखायचे कसे?


आता हे सारं वाचल्यानंतर तुमच्या प्रत्येकाच्या मनात वीरगळ नेमके ओळखायचे कसे? हा प्रश्न नक्की पडला असेल. याबाबत आम्ही वीरगळांची माहिती असलेल्या निबंध कानिटकर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ''साधारण अडीच ते तीन फुट उंचीच्या पाषाणावर किंवा शिळेवर एकावर एक असे तीन किंवा चार चौकौन खोदून त्यावर वीरांची कथा शिल्पांकित केलेली असते. एकदम खाली तो वीर मृत्यूमुखी पडलेला दाखवलेला असतो. त्याच्यावरती त्या वीराला अप्सरा स्वर्गात घेऊन जात आहेत असे कोरलेले असते. तर, वरच्या चौकोनात तो वीर शिवमय झाला हे दाखवण्यासाठी शिवपिंडीची पुजा करताना कोरलेला असतो. यामध्ये सर्वात वरती चंद्र - सुर्य दाखवलेले असतात. जोवर चंद्र- सुर्य आहेत तोवर त्या वीराचे स्मरण होत राहिल असा या चंद्र - सुर्य कोरण्याचा अर्थ आहे. तसेच वीरगती प्राप्त झालेल्या वीरासोबत त्याची पत्नी सती गेली असेल तर त्या वीरगळावर हात कोरलेला असतो. त्या हातावर बांगड्या किंवा केवळ हात कोरलेला असतो. त्याला सतीशिळा असे देखील म्हणत असल्याची माहिती दिली.


देशात वीरगळांची नेमकी स्थिती काय आहे?


इंग्रजीमध्ये या वीरगळांना 'हिरोस्टोन' असं म्हणतात. वीरगळांची ही परंपरा कर्नाकातून आपल्या राज्यात आल्याचं सांगितले जाते. कर्नाटकमध्ये अत्यंत मोठे शिल्पपट असलेले वीरगळ पाहायाला मिळतात. तुलनेनं राज्यात वीरगळांची ही संख्या कमी आहे. देशाच्या  उत्तरेकडील भागात वीरब्रह्म, दक्षिणेकडील कर्नाटकात कल्लू आणि केरळात तर्रा असे या वीरगळांना म्हटले जाते. कोकणात चालुक्य राजवटीत शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली अनेक शिवमंदिरे बांधली गेली .या मंदिरांच्या आवारात किंवा परिसरात असलेले वीरगळ आपले लक्ष्य वेधून घेतात. वीरगळांबाबत माहिती नसल्याने अनेकांना त्या पूजेच्या मूर्ती वाटतात. त्यामुळे नकळतपणे हात या ठिकाणी जोडले जातात.


राज्यातील गावांमध्ये देखील हे वीरगळ पाहायाला मिळतात. यावरून या गावचा, परिसराचा हजारो वर्षे जुना असा इतिहास उलगडला जाऊ शकतो. पण, हे वीरगळ सध्या दुर्लक्षित आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील उंबर्डी हे गाव वीरगळांचं संग्रहालय म्हणून ओळखले जातात. इथल्या शिवमंदिराच्या आवारात 45 वीरगळ आहेत. याठिकाणी सतीचे हात असलेले वीरगळ देखील पाहायाला मिळतात. इथून जवळच असलेल्या दिवेआगाराच्या रस्त्यावरील देगावच्या शीवमंदिराच्या शेजारी देखील असे वीरगळ दिसून येतात. बोरीवली जवळच्या एकसार गावामध्ये वीरगळावर नौकायुद्ध दाखवले आहे. हा वीरगळ शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यांच्यात झालेल्या युद्धाचा प्रसंग दाखवणारा आहे.


सातारा जिल्ह्यातील किकली, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वर मंदिराबाहेर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडा इथल्या विमलेश्वर मंदिराच्या बाहेर असे वीरगळ मांडून ठेवलेले आहेत.



वीरगळांचा अभ्यास होणे गरजेचं!


हजारो वर्षे जुन्या असलेल्या वीरगळांचा अभ्यास होणं गरजेचा आहे. परदेशातील अभ्यासक किंवा संशोधक यावर अभ्यास करत आहेत. सध्या हे वीरगळ दुर्लक्षित, ऊन, वारा आणि पाऊस यांचा मारा सोसत विखुरलेले दिसून येतात. त्यामुळे यांचं संवर्धन होणं आणि त्यांचा अभ्यास होणे काळाजी गरज आहे. कारण, हे वीरगळ हजारो वर्षे जुन्या अशा इतिहासाचे मुक साक्षीदार आहेत.