नागपूर : विमानाने नागपूर गाठून विदर्भातील विविध शहरातील गर्दी असलेल्या बाजारांमध्ये नागरिकांच्या खिशातून महागडे मोबाईल चोरणाऱ्या एका टोळीला नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 14 मोबाईल फोन जप्त केले असून या टोळीने आजवर शेकडोंच्या संख्येने मोबाईल लंपास केल्याची कबुली दिली आहे.


विशेष म्हणजे झारखंडमधील ही टोळी कोलकात्यातून चक्क विमानाने प्रवास करुन नागपुरात यायची. त्यानंतर नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ अशा शहरातील गर्दीच्या दिवशी बाजारांमध्ये जाऊन श्रीमंत नागरिकांना हेरुन त्यांच्या खिशातून महागडे मोबाईल लंपास करायची. नागपूरच्या गोकुळपेठ भाजी बाजारातूनच या टोळीने अनेक मोबाईल चोरल्याचे कबूल केले आहे.


या टोळीचा मोबाईल चोरीचा फंडा ही अनोखा असून एक जण गर्दीच्या ठिकाणी सावज शोधायचा. सावज निश्चित झाल्यावर टोळीतील इतर सदस्य बाजारात त्याचा पाठलाग करत तो व्यक्ती बाजारात सामान खरेदी करत असताना त्याच्या अवतीभवती उभे राहून गर्दीत त्याला धक्काबुक्की करायचे आणि त्याच गोंधळात तिसरा चोर खिशातून मोबाईल लंपास करायचा.


अनेक मोबाईल चोरल्यानंतर काही दिवसांच्या अंतराने टोळी विमानाने कोलकाता आणि नंतर झारखंडला परतायची आणि चोरलेल्या मोबाईल फोनची विल्हेवाट लावल्यानंतर पुन्हा चोरी करण्यासाठी विमानाने महाराष्ट्रात परतायची. तर टोळीचा एक सदस्य चोरलेले मोबाईल घेऊन रस्ते मार्गाने किंवा रेल्वे झारखंडला पार्ट जायचा.


सध्या पोलिसांनी या टोळीतील विक्की महतो आणि जाफर शेख या दोघांना अटक केली असून तिसरा सदस्य फरार झाला आहे. आता या टोळीच्या इतर सदस्यांना शोधून या टोळीने लंपास केलेले शेकडो मोबाईल जप्त करण्याचे आव्हान नागपूर पोलिसांसमोर आहे.