रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं आहे. या घटनेत पाणलोट क्षेत्रातील सात गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून 19 जण बेपत्ता झाले आहेत. तर सहा मृतदेह हाती लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. अलोरे-शिरगाव पोलिस चौकीच्या हद्दीत मंगळवारी (02 जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.


सततच्या पावसामुळे रात्री साडेआठच्या सुमारास सुरुवातीला तिवरे धरण भरुन वाहू लागलं. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचं लक्षात आल्याने गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला. त्यानंतर तासाभरातच धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले आणि खळबळ माजली.

ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसलं असून किमान 22-24 जण वाहून गेल्याची भीती आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. शिवाय पाण्याच्या जोरदार प्रवाहात 12 घरंही वाहून गेली आहेत.


एनडीआरएफचं पथक घटनास्थळी
याची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसंच पुणे आणि सिंधुदुर्गातून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

दरम्यान दादर पूल पाण्याखाली गेल्यानंतर सातही गावांचा चिपळूणशी संपर्क तुटला आहे.



दोन वर्षांपूर्वी धरणाला गळती
तिवरे धरण हे दापोली लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतं. 2000 साली या धरणांचं बांधकाम पूर्ण झालं. 20 लाख क्युबिक मीटर पाणीसाठी मावेल एवढी या धरणाची क्षमता आहे. परंतु मागील काही वर्षात या धरणाची दुरुस्ती झालेली नाही. अनेक गावांना या धरणाच्या पाण्याचा पिण्यासह शेतीसाठी उपयोग होतो. दोन वर्षांपूर्वी धरणाला गळती लागली होती, पण गेल्या वर्षी गळतीत वाढ झाली.

प्रशासनाच्या दुर्लक्षाची किंमत ग्रामस्थांना मोजावी लागेल : राष्ट्रवादी
तिवरे धरणाला पडलेले भगदाड आणि लागलेल्या गळतीची माहिती देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष होते. धरणाची दुरुस्ती न झाल्यास  पावसाळ्यात ग्रामस्थांना किंमत मोजावी लागेल. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी केला होता.

धरणातील पाणी संपलं, पण सतर्क राहावं लागेल
या घटनेनंतर स्थानिक आमदार सदानंद चव्हाण यांनी पाहणी केली. "तिवरे धरणातून भेंदवाडी इथे पाणी सोडलं जातं. परंतु तिथला भरावाचा भाग वाहून गेल्याने पाणी वाडीत शिरलं. यात वाडीतमधल्या 12-13 घरातील 22 ते 23 ग्रामस्थ वाहून गेली आहेत. आता धरणातील पाणी संपल असून धरणाशेजारील गावांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे, अशी माहिती सदानंद चव्हाण यांनी दिली. तसंच धरणाच्या गळतीबाबत गावकऱ्यांनी सूचना दिली होती. यानंतर प्रशासनाला ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे आदेशही दिले होते. परंतु त्यावर योग्यप्रकारे अंमलबजावणी झालेली नाही, हेच या घटनेवरुन दिसतंय, असंही सदानंद चव्हाण म्हणाले.

बेपत्ता लोकांची नावं

अनंत हरिभाऊ चव्हाण (वय 63 वर्ष)
अनिता अनंत चव्हाण (वय 58 वर्ष)
रणजित अनंत चव्हाण (वय 15 वर्ष)
ऋतुजा अनंत चव्हाण (वय 25 वर्ष)
दुर्वा रणजित चव्हाण (वय 1.5 वर्ष)
आत्माराम धोंडू चव्हाण (वय 75 वर्ष)
लक्ष्मी आत्माराम चव्हाण (वय 72 वर्ष)
नंदाराम महादेव चव्हाण (वय 65 वर्ष)
पांडुरंग धोंडू चव्हाण (वय 50 वर्ष)
रवींद्र तुकाराम चव्हाण (वय 50 वर्ष)
रेश्मा रविंद्र चव्हाण (वय 45 वर्ष)
दशरथ रविंद्र चव्हाण (वय 20 वर्ष)
वैष्णवी रविंद्र चव्हाण (वय 18 वर्ष)
अनुसिया सीताराम चव्हाण (वय 70 वर्ष)
चंद्रभागा कृष्णा चव्हाण (वय 75 वर्ष)
बळीराम कृष्णा चव्हाण (वय 55 वर्ष)
शारदा बळीराम चव्हाण (वय 48 वर्ष)
संदेश विश्वास धाडवे (वय 18 वर्ष)
सुशील विश्वास धाडवे (वय 48 वर्ष)
रणजित काजवे (वय 30 वर्ष)
राकेश घाणेकर (वय 30 वर्ष)