रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. कालपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. शिवाय शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील 24 तासाचा विचार करता 41 मिलीमीटर पेक्षा देखील जास्त पाऊस झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात 375 मिलीमीटर पेक्षा देखील जास्त पाऊस झाला आहे.
सध्या जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. पावसामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या 65 धरणांपैकी 34 धरणं 100 टक्के भरली आहेत. तर 2 धरणं 90 टक्के पेक्षा जास्त भरली आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यातील 2, दापोलीतील 5, खेड मधील 4, चिपळूणमधील 7, गुहागरमधील 1, संगमेश्वरमधील 5, रत्नागिरीतील 1, लांजा तालुक्यातील 5, राजापूरमधील 4 अशी जिल्ह्यातील 34 धरणं 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे आता जिल्हावासियांचा पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आहे. शिवाय, असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित धरणं देखील 100 टक्के भरतील.
शेतीच्या कामांना वेग
जूनच्या सुरूवातीला पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतीच्या कामांना देखील सुरूवात झाली. शेतकऱ्यांनी यावेळी भाताच्या पेरणीला सुरूवात केली. पण, ज्यावेळी रोपं लावणी योग्य झाली होती त्याचवेळी बळीराजानं पाठ फिरवली. परिणामी शेतीची कामे देखील खोळंबली होती. पाणथळ भागात शेतकऱ्यांन भातशेतीची लावणी उरकली. शिवाय. काही ठिकाणी अगदी पंपाच्या साहाय्याने देखील पाणी घेत भातशेतीची लावणी उरकली होती. पण, त्यानंतर देखील पावसाची परिस्थिती अशीच राहिल्याच शेतकऱ्याच्या चिंता वाढली होती. पण, मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. मध्यंतरीच्या दोन दिवस पावसानं काहीशी उसंत घेतली होती. पण, सरींवर पाऊस कोसळत नसल्याने बळीराजाचा खोळंबा झाला नव्हता. सध्याचा पाऊस पाहता शेतकरी राजा समाधान व्यक्त करत आहे. त्यामुळे आता भातशेतीची लावणी उरकण्याकडे त्याचा कल दिसून येत आहे.
भातशेतीत शिरलं पाणी
वरूणराजानं दमदार हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला. पण, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने काही ठिकाणी नदी किनारी असलेल्या भातशेतीत पाणी शिरल्याचे देखील चित्र दिसून आले. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांना काहीसे नुकसान सहन करावे लागले आहे. दरम्यान, पावसाचा जोर पाहता जिल्ह्यातील काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी भाताची रोपे काढून ठेवत पावसाचा जोर कमी होईल याची वाट पाहणे पसंत केले. पण, सध्याची पावसाची परिस्थिती जिल्ह्यावासियांकरता समाधानकारक आहे. सध्याचे चित्र पाहता जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असेच चित्र आहे.
Monsoon In Maharshtra | तळकोकणात पावसाचा जोर वाढला; मालवण, देवगड, सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस