हापूस! कोकणचा राजा. अनेकांचं आवडीचं फळ. मार्च महिना सुरू झाल्यानंतर हापूसच्या आगमनाची आणि त्याची चव चाखण्याची घाई प्रत्येक हापूस प्रेमीला असते. पण, यंदा मात्र पावसामुळे हापूस प्रेमींची निराशा होऊ शकते. कारण राज्याच्या इतर भागात कोसळत असलेला पाऊस अद्याप देखील कोकणातील बहुतांश भागात धो - धो कोसळत आहे. परिणामी त्याचा परिणाम हापूसच्या मोहोर प्रक्रियेवर होऊन हापूस बाजारात दाखल होण्यावर होऊ शकते. कारण, नोव्हेंबर महिन्यात पडणारी कडाक्याची थंडी हापूससाठी पोषक मानली जाते. पण, आता पाऊस कोसळत असल्यानं सारी गणितं बदलली आहे. त्यामुळे कोकणातील छोट्या - मोठ्या हापूस बागायतदारांना याचा फटका बसणार आहे. हापूसच्या मोहोर प्रक्रियेदरम्यान पाऊस झाल्यानं हापूसचं आगमन देखील लांबण्याची दाट शक्यता आहे. 

 

काय होईल परिणाम? 

दरम्यान, सध्याच्या वातावरणाचा काय परिणाम होईल? याची माहिती घेण्यासाठी 'एबीपी माझा'नं प्रदिप सावंत या आंबा बागायतदारांशी संपर्क केला. प्रदिप सावंत हे मागिल 30 ते 35 वर्षापासून आंबा व्यवसायात असून त्यांची जवळपास 1 हजार हापूस आंब्याची झाडं आहेत. यातून ते दरवर्षी किमान 2500 ते 3000 आंबा पेट्यांचं उत्पादन करतात. यावेळी बोलताना सावंत यांनी सांगितले, 'पावसानं आंबा बागायतदारांची सारी गणितं बिघडवली. काही जणांनी पहिली आणि दुसरी फवारणी झाडांवर केली असून त्यातून काही लाखांचा देखील खर्च केला आहे. कारण माझ्या एक हजार झाडांना फवारणी करण्यासाठी मला 8 ते 10 लाखांचा खर्च येतो. त्यावरून एक किमान तुम्हाला अंदाज येईल. पण, पावसानं केलेल्या साऱ्या फवारण्या मातीमोल केल्या. आता किमान कुठं तरी दिसणारा मोहोर जाणार. झाडांना रोगांचा सामना करावा लागणार. त्यामुळे फवारणीसाठीचा हा खर्च आणखी देखील वाढू शकतो. शिवाय, थंडी देखील न पडल्यास हापूसच्या मोहोर प्रक्रिया लांबल्यास त्याचा परिणाम हा हापूस बाजारात दाखल होण्यावर होणार आहे'  

 

निसर्ग बदलाचा काय होतोय परिणाम?

 सावंत पुढे म्हणाले, 'मी जवळपास 30 ते 35 वर्षापासून आंबा बागायतदार म्हणून व्यवहार करत आहे.पण. 2009 साली कोकण किनारपट्टीवर फयान चक्रीवादळ आलं. त्यानंतर वातावरणात सातत्यानं बदल जाणवू लागले. मागील दोन ते तीन वर्षाचा विचार केल्यास निसर्ग आमच्यावर आणखीच रूसला आहे कि काय? असा प्रश्न पडतो. 'फयान'मुळे झाडं मुळापासून हलली. अगदी हल्लीच आलेल्या 'निसर्ग चक्रीवादळा'नं  देखील मोठा फटका दिला. हे सारं कमी म्हणून कि काय, 'तोक्ते चक्रीवादळ' आलं. त्यानंतर यंदा मे महिन्याच्या मध्यात आलेल्या पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान झालं. हा मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अद्याप अर्थात नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सुरू आहे. मी यापूर्वी अगदी हजार झाडांमधून 5 ते 6 हजार आंब्याच्या पेट्या विकत असे. पण, निसर्ग बदलाचा आणि त्याच्या लहरीपणाचा फटका आम्हाला नक्कीच बसत आहे. अशावेळी काय करणार?',अशी प्रतिक्रिया त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. 

 

अर्थकारण बिघडतं

रत्नागिरी जिल्ह्यात किमान 66 हजार हेक्टरवर हापूसची लागवड आहे. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे या संपूर्ण लागवडीवर मात्र नक्कीच परिणाम होतो. वाढता खर्च, त्यानंतर मिळणारं उत्पन्न यांचा ताळमेळ देखील बसत नाही असं आंबा बागायतदार सांगतात. परिणामी निसर्गाची साथ हिच बळीराजासाठी महत्वाची आहे.